११ बालकांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान
गडचिरोली : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मुख्यमंत्री
यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झालेल्या नवनिर्मित महिला रुग्णालय, अहेरी येथे ० ते १८ वयोगटातील हृदयविकाराच्या संशयित बालकांसाठी २डी-ईको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ०३ डिसेंबर रोजी झालेल्या या शिबिरामुळे दुर्गम भागातील पालकांना मोठी आरोग्य सुविधा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध झाली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आरबीएसके-डीईआयसी (RBSK-DEIC) कार्यक्रमाद्वारे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सहसा जिल्हा स्तरावर होणारे हे मोफत २डी-ईको तपासणी शिबीर पहिल्यांदाच अहेरीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आयोजित करण्यात आले. यामुळे एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, अहेरी आणि सिरोंचा येथील बालकांच्या पालकांना उच्चस्तरीय तपासणीसाठी ये-जा करणे सोयीचे झाले. डॉ. माधुरी किलनाके (जिल्हा शल्य चिकित्सक) आणि डॉ. सतीशकुमार साळुंखे (अति. जिल्हा शल्य चिकित्सक) यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये अपोलो रुग्णालय, मुंबई येथील प्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण आणि त्यांची चमू उपस्थित होती. शिबिरात एकूण ३७ बालके/विद्यार्थी यांची २डी-ईको तपासणी करण्यात आली. यापैकी ११ बालकांना शस्त्रक्रियेची गरज असल्याचे निदान झाले असून, निदान निश्चिती झालेल्या बालकांच्या पालकांना याबद्दल संपूर्ण समुपदेशन करण्यात आले.
राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनेनुसार, पात्र बालकांना तृतीय स्तरीय संदर्भसेवेकरिता (शस्त्रक्रिया/उच्च उपचार) जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) कडून व्यवस्थापन केले जाणार आहे. या दुर्गम भागात तज्ज्ञांची सेवा उपलब्ध झाल्यामुळे आपल्या बालकांबाबत संभ्रमित असणारे पालक आनंदी झाले आहेत.