Home Breaking News *गडचिरोलीत एक असे गाव जिथे फक्त एकच घर, एकच कुटुंब!*

*गडचिरोलीत एक असे गाव जिथे फक्त एकच घर, एकच कुटुंब!*

0
45

 

गडचिरोलीत एक असे गाव जिथे फक्त एकच घर, एकच कुटुंब!

गडचिरोली : जेव्हा आपण एखाद्या सामान्य गावाची कल्पना करतो, तेव्हा नजरेसमोर अनेक घरे, ग्रामपंचायत आणि लोकांची वर्दळ असे चित्र उभे राहते. मात्र, गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यामध्ये इरपुंडी नावाचे एक असे गाव आहे, जिथे फक्त एकच घर आणि एकच कुटुंब वास्तव्य करत आहे.

झाडे कुटुंबातील सात सदस्य हीच या गावाची एकूण लोकसंख्या आहे. मागील ४० ते ४५ वर्षांपासून हे कुटुंब इरपुंडी या गावात एकमेव घरात राहत आहे. इरपुंडी हे गाव गडचिरोली शहरापासून ४२ किलोमीटर तर जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे ५० किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळचे मोठे गाव तुकुम हे पाच किलोमीटरवर आहे. विशेष म्हणजे, २०११ साली झालेल्या शासकीय जनगणनेत इरपुंडीची स्वतंत्र नोंद करण्यात आली असून, ते महसूली गाव म्हणून ओळखले जाते.

हे गाव अति दुर्गम आदिवासी बहुल भागात असले तरी, सरकारने या गावात सिमेंट रस्त्याचे बांधकामही करून दिले आहे. तसेच, येथे नेटवर्कची सुविधाही उपलब्ध आहे. घनदाट जंगलातील या घरात वास्तव्य करत असताना झाडे कुटुंबाला सातत्याने वन्यप्राण्यांची भीती वाटते. भीती वाटत असली तरी, जायचे तरी कुठे आणि उदरनिर्वाह करायचा कसा, असा मोठा प्रश्न झाडे कुटुंबासमोर आहे.

झाडे कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांचे पूर्वज ज्या ठिकाणी राहत होते, त्याच ठिकाणी त्यांचे सध्या वास्तव्य आहे. “राहून राहून आम्हाला सवय झाली. भीती वाटते, पण आता दुसरीकडे कुठे जाऊन आम्हाला जमीन आणि घर बांधण्यासाठी जागा मिळेल? म्हणून इथे राहावे लागते,” असे त्यांनी सांगितले. अवघ्या सात लोकसंख्येचे हे अनोखे गाव सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here