![]()
कुरखेडा पोलिसांची मोठी कारवाई; रोख रक्कम, १३ चारचाकी व ६ दुचाकीसह जुगार साहित्य ताब्यात
गडचिरोली, (दि. २१ एप्रिल २०२६) जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून, कुरखेडा तालुक्यातील जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यरात्री धाड टाकून २२ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत तब्बल ७१ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २१ एप्रिल रोजी रात्री सुमारे १ वाजताच्या सुमारास गेवर्धा परिसरातील जंगलात छापा टाकण्यात आला.
या ठिकाणी एजाज रफीक शेख उर्फ “कात्या” (वय ४१, रा. कुरखेडा) हा काही इसमांना एकत्र करून ५२ पत्त्यांच्या साहाय्याने पैशांचा जुगार खेळवत असल्याचे उघड झाले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी वेळीच सापळा रचत २२ जणांना ताब्यात घेतले.
मुद्देमालाचा तपशील :
कारवाईदरम्यान आरोपींकडून २ लाख ७५ हजार २०० रुपये रोख, ५२ पत्त्यांचे संच, २३ मोबाईल, १३ चारचाकी वाहने आणि ६ दुचाकी वाहने असा एकूण ७१,८५,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ करत आहेत.
वरिष्ठांचे मार्गदर्शन :
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कुरखेडा पोलिसांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.