![]()
आरमोरीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा उघड; 9.30 लाखांचा मुद्देमाल जप्त, आरोपी फरार
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखूच्या अवैध साठवणुकीवर आरमोरी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 9 लाख 30 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत तंबाखूचा मोठा साठा, चारचाकी वाहन आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून, मुख्य आरोपी सध्या फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 18 एप्रिल 2026 रोजी पोलीस स्टेशन आरमोरीच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, देऊळगाव येथील गोपाल निंबेकर हा आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवत आहे. या खात्रीशीर माहितीनंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला असता आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
झडतीदरम्यान पोलिसांना घरात मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचा सुगंधित तंबाखू सापडला. याशिवाय घराजवळ उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती व्हॅगेनार (MH 33 AC 6256) या वाहनातूनही तंबाखूचा साठा आढळून आला.
जप्त मुद्देमालात समावेश:
268 पॅकेट हुक्का शिशा तंबाखू (अंदाजे ₹2,96,900)
विविध ब्रँडचा सुगंधित तंबाखू व पान मसाला (₹97,790)
मारुती व्हॅगेनार चारचाकी वाहन (₹5,00,000)
मोबाईल व इतर साहित्य (₹36,300)
एकूण ₹9,30,990 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी गोपाल हरीराम निंबेकर (देऊळगाव) व यशवंत विठ्ठल हर्षे (गिलगाव) यांच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय चलाख करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज. जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कैलास गवते यांच्या नेतृत्वात पार पडली.
👉 आरमोरी पोलिसांची ही कारवाई जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसायावर मोठा आघात मानली जात आहे.