Home Breaking News ‘हिडमा’ गाण्यावर नृत्य सादर केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा; कारवाईविरोधात गडचिरोलीतून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

‘हिडमा’ गाण्यावर नृत्य सादर केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा; कारवाईविरोधात गडचिरोलीतून मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

0
1

गडचिरोली : पुण्यातील विश्रांतवाडी येथील समाजकल्याण वस्तीगृहात सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याविरोधात गडचिरोलीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संबंधित विद्यार्थ्यांवरील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करत जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

निवेदनानुसार, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आदिवासी परंपरेवर आधारित नृत्य सादर केले होते. मात्र ‘हिडमा’ या गाण्यावर सादरीकरण केल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने ही कारवाई अन्यायकारक, असंवेदनशील व दडपशाहीची असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सदर विद्यार्थी गडचिरोली जिल्ह्यातील झिंगानूर तालुक्यातील रहिवासी असून उच्च शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यांचा कोणत्याही नक्षलवादी विचारसरणीशी संबंध नसून केवळ सांस्कृतिक अभिव्यक्तीसाठी त्यांना गुन्हेगार ठरविणे हे चुकीचे असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, संबंधित गाण्यावर कोणतीही अधिकृत बंदी नसताना विद्यार्थ्यांवर कारवाई करणे हा कायद्याचा गैरवापर असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक भवितव्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

निवेदनात विद्यार्थ्यांवरील गुन्हा तात्काळ मागे घेण्यासोबतच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. न्याय, समता आणि संवैधानिक अधिकारांचे संरक्षण करत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी अधिवक्ता एड. मिनार खोब्रागडे तसेच अहेरी पत्रकार संघटनेचे सदस्य दीपक सुनतकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here