Home Breaking News आयटक-भाकपाच्या लढ्याला यश! सिरोंच्यातील आशा वर्करांना कोरोना प्रोत्साहन...

आयटक-भाकपाच्या लढ्याला यश! सिरोंच्यातील आशा वर्करांना कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याचे लेखी आदेश

0
6

आयटक-भाकपाच्या लढ्याला यश!

सिरोंच्यातील आशा वर्करांना कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्याचे लेखी आदेश

सिरोंचा, प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवेचा कणा म्हणून काम करणाऱ्या आशा वर्करांच्या प्रलंबित कोरोना प्रोत्साहन भत्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भाकपा व आयटकच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर आणि ११ जून रोजी प्रस्तावित धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत पात्र आशा सेविकांना थकीत भत्ता अदा करण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.

दिनांक ४ जून २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांना भाकपा जिल्हा सहसचिव तथा आयटक अहेरी विधानसभा अध्यक्ष कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले होते. यावेळी भाकपा जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार, भाकपा तालुका सचिव कॉ. रवी बारसांगडी यांच्यासह तालुक्यातील सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या.

निवेदनात कोरोना काळात शासनाच्या विविध आरोग्य मोहिमांमध्ये कार्यरत राहिलेल्या आशा वर्करांना शासन निर्णयानुसार देय असलेला कोरोना प्रोत्साहन भत्ता तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना पात्र आशा सेविकांना भत्ता अदा करण्याबाबत निर्देश दिले असून, सात दिवसांच्या आत अंमलबजावणीचा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

कोरोना महामारीच्या संकटकाळात आशा वर्करांनी गावागावात जाऊन सर्वेक्षण, रुग्ण शोध मोहीम, लसीकरण, जनजागृती तसेच क्वारंटाईन व्यवस्थापन यांसारख्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडल्या. संसर्गाचा धोका पत्करून केलेल्या या सेवेबद्दल शासनाने प्रतिमहिना एक हजार रुपये प्रमाणे २८ महिन्यांचा कोरोना प्रोत्साहन भत्ता मंजूर केला होता. मात्र हा भत्ता दीर्घकाळ रखडल्याने आशा वर्करांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रस्तावित धरणे आंदोलनापूर्वीच प्रशासनाने घेतलेल्या निर्णयामुळे आशा वर्करांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या न्याय्य मागणीला अखेर यश मिळाले आहे.

“आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे

आशा वर्करांच्या मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीने पाहत घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया कॉ. सचिन मोतकुरवार यांनी व्यक्त केली. या प्रक्रियेत पंचायत समिती प्रशासनासोबतच सिरोंचा पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. आता जारी करण्यात आलेल्या आदेशांची वेळेत आणि प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे तालुक्यातील शेकडो आशा वर्करांच्या प्रलंबित भत्त्याचा मार्ग मोकळा झाला असून भाकपा व आयटकच्या संघर्षाला यश मिळाल्याची भावना आशा वर्करांमधून व्यक्त होत आहे. :::

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here