Home Breaking News “गाण्यावर बंदी नाही, मग नाच गुन्हा कसा?” – ‘हिडमा’ नृत्यावर विद्यार्थ्यांवर गुन्हा;...

“गाण्यावर बंदी नाही, मग नाच गुन्हा कसा?” – ‘हिडमा’ नृत्यावर विद्यार्थ्यांवर गुन्हा; आजाद समाज पक्षाचा संताप

0
1

गडचिरोलीतील विद्यार्थ्यांवर पुण्यात कारवाई; गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

पुणे, ( प्रतिनिधी ): पुण्यातील विश्रांतवाडी येथील समाजकल्याण वस्तीगृहात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. “हिडमा” या गाण्यावर नृत्य सादर केल्याच्या कारणावरून गडचिरोली जिल्ह्यातील किरण गोमासे आणि श्रीनिवास कुमरी या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे दोन्ही विद्यार्थी सध्या पुण्यात उच्च शिक्षण घेत असून समाजकल्याण वसतिगृहात वास्तव्यास आहेत. त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या नक्षलवादी विचारसरणीशी संबंध नसतानाही केवळ आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने ही कारवाई अन्यायकारक, असंवेदनशील आणि दडपशाहीची असल्याचा आरोप आजाद समाज पक्षाने केला आहे.

पक्षाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित “हिडमा” गाण्यावर शासनाने कोणतीही अधिकृत बंदी घातलेली नाही. हे गाणे यूट्यूबसारख्या माध्यमांवर सहज उपलब्ध आहे. जर गाण्यावर बंदीच नाही, तर त्यावर नृत्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करणे हा कायद्याचा चुकीचा वापर असून तर्कसंगत व न्याय्य नाही.

ही कारवाई विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि मानसिक आयुष्यावर गंभीर परिणाम करणारी असून त्यांच्या भविष्यावर घाला घालणारी आहे, असेही पक्षाने नमूद केले आहे. या प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून संबंधित विद्यार्थ्यांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.

इशारा आंदोलनाचा :

जर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही आजाद समाज पक्षाने दिला आहे.

कोट :

“न्याय, समता आणि संविधानिक अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय सहन केला जाणार नाही.”

— राज बन्सोड, जिल्हाध्यक्ष, आजाद समाज पक्ष, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here