Home Breaking News गडचिरोलीत मोठा प्रशासकीय बदल! ‘नक्षलविरोधी चेहरा’ निलोत्पल कोल्हापूरला, एम. रमेश यांच्याकडे जिल्ह्याची...

गडचिरोलीत मोठा प्रशासकीय बदल! ‘नक्षलविरोधी चेहरा’ निलोत्पल कोल्हापूरला, एम. रमेश यांच्याकडे जिल्ह्याची धुरा

0
15

साडेतीन वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानंतर बदली; नक्षलमुक्तीच्या मोहिमेला वेग देण्याचे नवे आव्हान

गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्याच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठा बदल झाला असून, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश यांची नव्या जिल्हा पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित केले.

निलोत्पल यांनी गडचिरोलीत तब्बल साडेतीन वर्षे कार्य करत जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ एसपी म्हणून सेवा बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन केले. दुर्गम आणि संवेदनशील भागात कारवाया तीव्र करत ५० हून अधिक जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले, तर आत्मसमर्पण धोरण प्रभावीपणे राबवून शेकडो नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यात आले.

या काळातील सर्वात मोठी कामगिरी म्हणजे नक्षल चळवळीतील ‘थिंक टँक’ आणि केंद्रीय समिती सदस्य असलेल्या कमांडर भूपती याचे आत्मसमर्पण. या घटनेने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते.

दरम्यान, नव्याने नियुक्त झालेले एसपी एम. रमेश हे गडचिरोलीच्या परिस्थितीशी पूर्णपणे परिचित आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणून काम करताना त्यांनी नक्षलविरोधी मोहिमेत सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे सातत्य आणि धोरणात्मक स्थैर्य म्हणून पाहिले जात आहे.

सध्या गडचिरोली जिल्हा औद्योगिक विकासाच्या उंबरठ्यावर असून ‘स्टील हब’ म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवणे, उद्योगांना संरक्षण देणे आणि स्थानिकांचा विश्वास संपादन करत उर्वरित नक्षली चळवळीचा पूर्णपणे बीमोड करणे, हे मोठे आव्हान एम. रमेश यांच्यासमोर असेल.

नव्या नेतृत्वामुळे गडचिरोलीच्या सुरक्षाव्यवस्थेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here