Home Breaking News राष्ट्रीय युवा दिनी जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण; समाजहितासाठी कार्य करणाऱ्या युवक-युवती व...

राष्ट्रीय युवा दिनी जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण; समाजहितासाठी कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव

0
39

 

राष्ट्रीय युवा दिनी जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण; समाजहितासाठी कार्य करणाऱ्या युवक-युवती व संस्थांचा गौरव

गडचिरोली : दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण–२०१२ अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या युवा धोरण–२०१२ नुसार जिल्ह्यातील युवक, युवती तसेच सामाजिक संस्थांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२४–२५ या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण काल राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने पार पडले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त दि. १२ जानेवारी २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारामुळे युवक-युवती व सामाजिक संस्थांना युवक विकासाच्या कार्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

जिल्हा युवा पुरस्कार निवड समिती, गडचिरोली यांच्या माध्यमातून सन २०२४–२५ या वर्षासाठी पुढील पुरस्कारार्थींची निवड करण्यात आली आहे.
युवक पुरस्कारासाठी पंकज सुधाकर लाडे (रा. चोप, पो. कोरेगांव, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली), युवती पुरस्कारासाठी कु. जान्हवी विजय पेद्दीवार (रा. चामोर्शी, जि. गडचिरोली) तर संस्थात्मक पुरस्कारासाठी आधार विश्व फाउंडेशन, गडचिरोली (सुशील रामराव हिंगे, आशिर्वाद हिंगे, आशिर्वाद नगर, कॅनरा बँकेच्या मागे, गडचिरोली) यांची निवड करण्यात आली.

या पुरस्कारांचे स्वरूप युवक व युवती यांना प्रत्येकी रोख रक्कम रुपये दहा हजार, तर संस्थेला रोख रक्कम पन्नास हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.

या प्रसंगी जिल्हा युवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी नितिन गावंडे, सदस्य सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, पुरस्कारार्थी, संस्थेचे पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here