–अरुण गिते, संचालक, भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
गडचिरोली(गो. वि.)दि.14 “बोलींना व बोली बोलणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी, संस्कृतीचे जतन करून बोलीतील साहित्य जिवंत ठेवण्यासाठी, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने बोलींचा जागर हा उपक्रम सुरु केलेला आहे. या अंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बोली व त्याविषयीची माहिती, अभ्यास, संशोधन, काम करणाऱ्या व्यक्ती यांचा शोध घेतला जाईल व त्याविषयक माहितीचे संकलन आणि जतन केले जाईल. महाराष्ट्र शासन भाषा संचालनालयाच्या वतीने आगामी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ‘बोलींचा जागर’ हा विशेष कार्यक्रम राज्यस्तरावर घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे,” असे प्रतिपादन अरुण गिते, संचालक, भाषा संचालनालय यांनी गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे आयोजित बैठकीत नुकतेच केले. महाराष्ट्र शासन बोलींच्या जतन व संवर्धनाच्या दृष्टीने येत्या जानेवारीत नागपूर येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणार असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या त्या भागात बोलल्या जाणाऱ्या बोलींवर विद्यापीठांच्या माध्यमातून कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली परिक्षेत्रातील विविध बोलींचा अभ्यास, बोली अभ्यासकांनी समन्वय व पुढील नियोजित कार्यशाळेच्या कार्यपद्धतीबाबत बोली संशोधक व अभ्यासक यांची बैठक गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबईचे मा. संचालक अरुण गिते, भारत जाधव, संजय पवार, मराठी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. सविता गोविंदवार, झाडीपट्टीच्या बहिणाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ८५ वर्षीय कवयित्री अंजनाबाई खुणे, नवरगाव येथील सुप्रसिद्ध लेखक व नाट्यदिग्दर्शक सदानंद बोरकर, लेखक डॉ. श्याम मोहरकर यांच्या प्रमुख उपस्थिती होती.
प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी “‘बोलींचा जागर’ ची महाराष्ट्रातील पहिली प्रत्यक्ष सभा गोंडवाना विद्यापीठात होणे ही आनंदाची व अभिमानाची बाब असून त्यासाठी मराठी विभागाचे अभिनंदन केले पाहिजे तसेच गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे यांच्या प्रयत्नांनी गेल्या काही वर्षांपासून झाडी, गोंडी व माडिया बोलींवर सातत्याने काम सुरु आहे. विद्यापीठाने स्वतंत्र झाडीबोली साहित्य दालनाची स्थापना केलेली आहे. या निमित्ताने शासनाने या कामाची दखल घेतली, याचा आनंद आहे.” असे ते म्हणाले. विभाग प्रमुख डॉ. सविता गोविंदवार यांनी आयोजक या नात्याने स्वागतपर भाषण केले. महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी भारत जाधव यांनी बैठकीचा उद्देश व त्यामागील भुमिका विषद केली. डॉ. संजय पवार यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. कवयित्री अंजनाबाई खुणे यांनी त्यांच्या झाडीबोलीतील कविता सादर करून झाडीबोलीच्या गोडव्याचे महत्त्व पटवून दिले. नाट्यदिग्दर्शक व लेखक सदानंद बोरकर यांनी झाडीबोली महोत्सवाचे आयोजन करून त्यात दंडार, डहाका, खडीगंमत यासारख्या लोककलांचे सादरीकरण व्हावे व लोककलाकारांना न्याय मिळावा, असे मत व्यक्त केले. साहित्यिक डॉ. विद्याधर बन्सोड यांनी नवनवीन कल्पनांना स्वीकारून त्यांची अंमलबजावणी करण्यात गोंडवाना विद्यापीठ नेहमी अग्रेसर असते तसेच कुलगुरू महोदयांनी विविध विकासात्मक कामांना गती दिलेली आहे व बोलींचा जागर या उपक्रमाच्या माध्यमातून या भागातील सर्व बोली अभ्यासकांना एकत्र आणण्याचे काम केले असून ही बैठक महाराष्ट्रातील बोली परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी दिशादर्शक आहे.
भाषा अभ्यासक संतोष मेश्राम यांनी “बोली भाषा ही त्या त्या समाजाच्या इतिहासाची, जीवनपद्धतीची ज्ञानपरंपरेची आणि सांस्कृतिक अस्मितेची वाहक असते व बोली भाषा नष्ट होणे म्हणजे त्या समाजाच्या सांस्कृतिक अस्तित्वावर घाला होय.” असे सांगून शासनाने तज्ज्ञ समिती स्थापन करावी, बोली अभ्यासकांची नोंद घेऊन समन्वय साधावा, अॅपच्या निर्मितीसाठी आर्थिक व तांत्रिक पाठबळ द्यावे असे सुचविले. बैठकीला झाडीबोली साहित्य दालनाचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे, मराठी विभागाचे डॉ. निळकंठ नरवाडे, प्रा. अमोल चव्हाण, तर चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या झाडीपट्टी भागातून झाडीबोली लेखक डॉ. विद्याधर बन्सोड, झाडीपट्टी मंडळाचे विनायक धानोरकर, गोंडी व माडिया बोली अभ्यासक डॉ. नरेश मडावी, डॉ. गजानन कोर्तलवार, सुनिल बावणे (कवी नील), अरुण झगडकर, मनिषा मडावी, संजय निंबेकर, नत्थूजी चिमूरकर, संतोष मेश्राम, धनंजय पोटे, प्रतिक्षा कोडापे, गायत्री गुरव, गजानन गेडाम, प्रशान्त भंडारे, कवी उपेंद्र रोहणकर, डॉ. राम वासेकर, रत्नमाला भोयर, सुनिल गोटे, वर्षा पडघम, सुनील बोरकर यासह विविध बोलींचे ३० अभ्यासक उपस्थित होते.
दिनांक ११ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या मराठी विभाग प्रमुखांची आभासी बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर पहिली प्रत्यक्ष बैठक गोंडवाना विद्यापीठात घेण्यात आली. बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. झाडीपट्टी भागात बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा असून चार जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातही संमिश्र बोली बोलल्या जातात, त्यामध्ये झाडी, गोंडी, माडिया, पोवारी, परधानी, छत्तीसगडी, हलबी, तेलगू इत्यादी बोलीभाषांच्या जतन व संवर्धनाबाबत कोणती पावले उचलणे गरजेचे आहे, याचा उहापोह करण्यात आला. बोली अभ्यासकांनी त्यांच्या अभ्यासाबद्दल व बोलींना जिवंत ठेवण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांबद्दल संचालक अरुण गिते यांचेशी मुक्तपणे चर्चा केली.
शासनाने बोलींच्या लिखित दस्तावेजाचे संकलन व प्रकाशन, विविध संमेलने, लोककलांचा जागर, ग्रामीण संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी काम करणाऱ्या विविध मंडळे, संस्था, व्यक्ती यांना आर्थिक आणि अन्य प्रकारचे सहकार्य करावे. बोलींचा जागर हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून या माध्यमातून कानाकोपऱ्यात बोलींना जागविण्यासाठी काम करणाऱ्यांची दाखल घेतली जाईल तसेच त्यांचे विस्कळीत साहित्य एकत्रित आणले जातील. बोलीसाहित्यिकांना पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान मिळावे, कलाकारांना प्रतिष्ठा मिळावी, लोककला मंच व्हावा. ऑनलाईन अॅप तयार करून बोलीभाषांचे उपयोजकामध्ये संवर्धन करावे. अशा मागण्या व प्रतिक्रिया बैठकीत अभ्यासकांकडून आल्या. बोलींचे जतन, संवर्धन व विकासाच्या दृष्टीने ही सभा दिशादर्शक ठरली. सभेत झाडीबोली अभ्यासकांचा अधिक प्रभाव राहिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. निळकंठ नरवाडे यांनी आभार प्रदर्शन डॉ. हेमराज निखाडे यांनी केले. तरूण पिढीने बोली भाषांकडे वळावे यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.