प्रलंबित तक्रारींचे तातडीने निवारण करण्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश; तालुका स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन
गडचिरोली, दि. ११: — प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभाग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनानुसार गडचिरोली जिल्ह्यात दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत ‘सुशासन सप्ताह – प्रशासन गाँव की और 2025’ हा विशेष उपक्रम सुरू होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सर्व विभागांना तक्रार निवारण प्रक्रियेला गती देणे, शासकीय सेवा नागरिकांच्या दारी पोहोचवणे आणि शासन-जनता संवाद अधिक सक्षम करणे हा या अभियानाचा प्रमुख हेतू आहे.
या अभियानाच्या सुचारू अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्व विभागांना केंद्र शासनाचे PG Portal / CPGRAMS, राज्य शासनाचे आपले सरकार पोर्टल, तसेच जिल्हा प्रशासनाचे जननिवेदन पोर्टल व कार्यालयीन टपाल ट्रॅकर यांवर प्रलंबित असलेल्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. कोणतीही तक्रार प्रलंबित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
अभियानाचा व्यापक लाभ नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी दि. 19 ते 25 डिसेंबर 2025 या कालावधीत तालुका स्तरावर विशेष शिबिरे व मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांद्वारे विविध विभागांच्या शासकीय सेवा नागरिकांना थेट उपलब्ध करून देणे, तसेच प्राप्त तक्रारींचे त्वरित मार्गदर्शन व निवारण करणे यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांनी या शिबिरांचा सक्रियपणे लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पंडा यांनी केले आहे.
याशिवाय, सुशासन सप्ताहाचा मुख्य कार्यक्रम व कार्यशाळा दि. 23 डिसेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे होणार आहे. या कार्यक्रमात विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून तक्रार निवारण प्रक्रियेला अधिक प्रभावी व जलद करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाणार आहे.