गडचिरोलीत 12 ते 18 डिसेंबरदरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन
गडचिरोली, दि. 11 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही “क्रीडा सप्ताह 2025-26” भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. क्रीडा संस्कृतीची जोपासना, खेळाडू व विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभाव, स्पर्धात्मकता आणि आरोग्यवर्धनाचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
या अनुषंगाने दि. 12 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी दरवर्षी हा सप्ताह राज्यातील सर्व जिल्ह्यांत साजरा केला जातो.
*विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन*
क्रीडा सप्ताहाच्या कालावधीत दि. 12 ते 18 डिसेंबर 2025 या दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे खालील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे—
बॉक्सिंग, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कुस्ती, कबड्डी, खो-खो, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस.
याशिवाय खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी फिटनेस चाचण्या, आहार मार्गदर्शन, आरोग्य तपासणी आदी प्रोत्साहनात्मक उपक्रमही राबविले जातील. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका संयोजक व स्थानिक क्रीडा मंडळांमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
*राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव — 18 डिसेंबरला समारोप सोहळा*
क्रीडा सप्ताहाचा समारोप दि. 18 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजता होईल. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.
तसेच आठवडाभरात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांतील विजेते व उपविजेत्या स्पर्धकांना पदके व गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळे व विविध संस्थांनी आपल्या स्तरावर क्रीडा सप्ताहाचे उपक्रम आयोजित करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.