
![]()
कोरची : कोरची शहर मुख्यालयापासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर बुधवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांच्या घटनेने कोरची तालुक्यात शोककळा पसरली आहे. साकोली-कुरखेडा बसला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर काही अंतरावर मॅक्स चारचाकी वाहन पलटी होऊन झालेल्या दुसऱ्या अपघातात दिलीप रामचंद्र धाकडे (ग्रामपंचायत सचिव, अलीटोला) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन्ही अपघातांत मिळून एकूण ८ जण जखमी झाले आहेत.
कोरचीवरून कुरखेडाकडे निघालेली साकोली-कुरखेडा बस दुपारी १२.३० च्या सुमारास मोहगावजवळ आली असता, विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने तिला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, बसचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु बस चालक आणि ५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे दाखल करण्यात आले आहे.
बस अपघाताच्या ठिकाणापासून काही अंतरावर एमएच २२ डी १९९० क्रमांकाची मॅक्स चारचाकी गाडी पलटी झाली. या अपघातात दिलीप रामचंद्र धाकडे यांचा जागीच मृत्यू झाला. धाकडे हे अलीटोला ग्रामपंचायत येथे मागील कित्येक वर्षांपासून सचिव म्हणून कार्यरत असल्याने कोरची शहरात शोककळा पसरली आहे. या कार अपघातात ३ व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय कोरची येथे उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या घटनांनंतर पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, तपास सुरू आहे. मात्र, सदर परिसरात अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नसून वेळोवेळी अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे नागरिकांनी हे स्थळ अपघात प्रवण स्थळ (ब्लॅक स्पॉट) म्हणून घोषित करून त्या ठिकाणी तातडीने फलक लावण्यात यावा, अशी मागणी कोरची तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. या घटनेचा तपास पोलीस स्टेशन कोरचीचे प्रभारी अधिकारी शैलेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.