
नागपूर : अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याची गंभीर तक्रार लोकसेवा आयोगाकडे झाली आहे. याप्रकरणी सामान्य प्रशासन विभागाकडून कारवाईचे निर्देश येऊनही कारवाई का होत नाही, असा थेट सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.
विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणांवर वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. वडेट्टीवार यांनी राज्यात एकूण ३५९ अधिकारी व कर्मचारी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी करत असल्याचा दावा केला. त्यांनी विशेषतः अहेरी येथील मुख्याधिकारी गणेश शहाणे यांच्या प्रकरणाचा उल्लेख करत, “अवर सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाकडून कारवाई करण्याचे निर्देश आल्यावरही कारवाई का करण्यात आलेली नाही? असा कोणता राजकीय दबाव आहे की या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही?” असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.
गणेश शहाणे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी बळकावल्याच्या आरोपावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित यादी संबंधित विभागाला पाठवण्यात आली आहे. तसेच, तीन महिन्यांत कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले. वडेट्टीवार यांनी बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे.