एटापल्ली : अहेरी विधानसभा क्षेत्रातील राजकीयसमीकरणे वेगाने बदलू लागली असून, माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेटचे राजे राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात शेकडो नागरिकांनी इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे विरोधकांना मोठा धक्का बसला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले आहे.
राजे अम्ब्रीशराव आत्राम यांची युवा, कर्तृत्ववान प्रतिमा आणि जनतेच्या प्रश्नांसाठी थेट मैदानात उतरण्याची कार्यशैली यामुळे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचा ओढा भाजपकडे वाढत आहे. “राजे साहेबांची लोकाभिमुख कार्यशैली आणि विकासाची ठाम भूमिका हीच अहेरीच्या प्रगतीचा आधार आहे,” अशा भावना पक्षप्रवेश करणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केल्या.
या सोहळ्यात शामराव दोरपेट्टी, विजय चिपकुर्तीवार, संतोष पुंगाटी, संजय लेकामी, राकेश आलाम, बिरगू हिचामी, सीमा कोरमी, देवाजी हिचामी, राजू पदा, सत्तू हिचामी, प्रवीण आलाम, विनोद हेडो यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यावेळी प्रामुख्याने हेडरी, जांबिया, पार्सलगुंदी, आलेंगा, मंगेर, टिटोळा, गट्टा, पुसूमपल्ली, नेडेर या गावांतील ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना अम्ब्रीशराव आत्राम म्हणाले, “अहेरी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. आज भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सन्मान राखला जाईल आणि सर्वांना सोबत घेऊन या भागाचा कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी नऊ ते दहा गावांतील शेकडो नागरिकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अहेरी विधानसभा क्षेत्रात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या पक्षप्रवेशामुळे इतर राजकीय पक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून भाजपची ताकद मात्र दुप्पट झाली आहे.