![]()
गडचिरोली पोलीस दलातर्फे ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत १२ व्या स्पर्धा परीक्षा सराव पेपरचे आयोजन
गडचिरोली : दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘पोलीस दादालोरा खिडकी’ आणि ‘यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत शनिवारी जिल्ह्यात भव्य मोफत सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला जिल्ह्यातील तब्बल ४,३०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहीद पांडु आलाम सभागृहासह जिल्ह्यातील पोस्टे, उपपोस्टे आणि पोलीस मदत केंद्र स्तरावर उभारण्यात आलेल्या ७४ वाचनालयांमध्ये हा सराव पेपर क्रमांक १२ पार पडला. आगामी पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी आणि संयुक्त परीक्षांच्या पार्श्वभूमीवर या सराव संचाचे नियोजन करण्यात आले होते.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे अतिशय दुर्गम मानल्या जाणाऱ्या भामरागड, एटापल्ली, अहेरी, हेडरी आणि सिरोंचा या भागातही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेषतः नव्याने उभारण्यात आलेल्या पेनगुंडा (१२ विद्यार्थी), नेलगुंडा (१५ विद्यार्थी) आणि वांगेतुरी (१५ विद्यार्थी) यांसारख्या संवेदनशील भागातील विद्यार्थ्यांनीही पहिल्यांदाच अशा सराव परीक्षेत सहभाग घेतला. ‘एक गाव एक वाचनालय’ अंतर्गत डिसेंबरमध्येच स्थापन झालेल्या गर्देवाडा येथील बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयात ८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पोलीस मुख्यालय परिसरात २,५५३ विद्यार्थ्यांनी सराव पेपर सोडवला.
गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रतिभावान विद्यार्थी मार्गदर्शनाअभावी मागे पडतात. त्यांच्यात वाचनाची ओढ निर्माण व्हावी आणि स्पर्धा परीक्षांची भीती दूर व्हावी, हा या ‘प्रोजेक्ट उडान’चा मुख्य उद्देश आहे. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि सार्वजनिक वाचनालयांचा वापर परीक्षा केंद्र म्हणून करण्यात आला, ज्यामुळे स्थानिक स्तरावर शिक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हा उपक्रम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आला. नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी यासाठी अथक परिश्रम घेतले.