२७ वर्षीय तरुण व ७० वर्षीय वृद्ध महिलेने उचलले टोकाचे पाऊल
गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बुर्गीपोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या येमली गावात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आपले जीवन संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका २७वर्षीय तरुणाने आणि ७० वर्षीय वृद्ध महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.
येमली येथील मुकेश रामदास मडावी (२७) या तरुणाचा शनिवारी रात्री मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, १७ जानेवारी रोजी रात्री मुकेश बराच वेळ बाथरूममधून बाहेर न आल्याने त्याच्या आईला संशय आला. त्यांनी तपासले असता मुकेश मृतावस्थेत आढळून आला. मुकेशने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह एटापल्ली येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
तरुणाच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, याच गावातील पिल्ली मुरा गोटा (७०) या वृद्ध महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले. वाढते वय, आजारपण किंवा मानसिक एकाकीपणा यातून त्यांनी हे पाऊल उचलले असावे, अशी चर्चा गावात आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
एकाच दिवशी दोन मृत्यू झाल्याने येमली गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मानसिक तणाव आणि सामाजिक समस्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. बुर्गी पोलीस ठाण्याचे अधिकारी या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.