नक्षलवादावर शिक्षणातून प्रहार; गडचिरोलीचे विद्यार्थी आता ‘ग्लोबल’:
गडचिरोली : नक्षलवादाचा शिक्का पुसून गडचिरोलीला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. आज या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी थेट ऑस्ट्रेलियात जाऊन प्रशिक्षण घेत आहेत, हे चित्र बदलत्या महाराष्ट्राची नांदी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील गोंडवाना विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहपालकमंत्री आशीष जयस्वाल, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री म्हणाले, केवळ पदव्या देणारे शिक्षण न देता, उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर सरकारने भर दिला आहे. गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड मेटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेले हे इन्स्टिट्यूट याचे उत्तम उदाहरण आहे. विद्यार्थी ज्या दिवशी पदवी घेऊन बाहेर पडतील, त्याच दिवशी त्यांच्या हातात रोजगाराची संधी असेल. या केंद्रासाठी उद्योगांकडून २५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून,
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’, ‘मायनिंग’ आणि ‘मेटलर्जी’ यांसारख्या भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमांवर येथे भर दिला जात आहे.
पोलीस विभागामार्फत आयोजित सांस्कृतिक महोत्सवातदेखील मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.
‘कर्टिन युनिव्हर्सिटी’ सोबतचा करार मैलाचा दगड
गोंडवाना विद्यापीठाने ऑस्ट्रेलियाच्या नामांकित ‘कर्टिन युनिव्हर्सिटी’ सोबत केलेला करार हा जिल्ह्यासाठी मैलाचा दगड ठरला आहे. यामुळे खाण क्षेत्रातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आता स्थानिक विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले. ज्या मुलांनी कधी मुंबई-नागपूर पाहिले नव्हते, ती मुले आज जागतिक स्पर्धेत उतरली आहेत. येथील ‘लँग्वेज लॅब’ मुळे आदिवासी भागातील विद्यार्थी अवघ्या चार महिन्यांत आत्मविश्वासाने इंग्रजीतून संवाद साधत आहेत, हे परिवर्तनाचे मोठे लक्षण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
२०२६ पर्यंत विमानतळ उभारणी
शिक्षणासोबतच जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी तीन लाख कोटींची गुंतवणूक आणि दळणवळणासाठी २०२६ पर्यंत विमानतळ उभारणीचा मानसही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. गडचिरोली आता राज्याचा शेवटचा जिल्हा न राहता, शिक्षणाचे आणि उद्योगाचे ‘प्रवेशद्वार’ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.