मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी गडचिरोलीकर ‘वेठीस’; वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप:
गडचिरोली : राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या गडचिरोली शहरातील कार्यक्रमादरम्यान संपूर्ण शहरात प्रचंड ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली. व्हीआयपी दौऱ्याच्या सुरक्षेच्या नावाखाली रस्ते बंद करण्यात आल्याने सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
विशेष म्हणजे, या ट्रॅफिक जाममुळे आपत्कालीन सेवांवर गंभीर परिणाम झाला असून रुग्णांना घेऊन जाणाऱ्या अम्ब्युलन्सनाही वेळेत मार्ग मिळाला नाही. काही ठिकाणी अम्ब्युलन्स वाहन अर्धा तासाहून अधिक काळ अडकून पडल्याच्या घटना समोर आल्या असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
कामावर जाणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, वृद्ध नागरिक व महिला यांना तासन्तास रस्त्यावर अडकून त्रास सहन करत उभे राहावे लागले. अनेकांनी “मुख्यमंत्री दौरा म्हणजे नागरिकांचा छळ का?” असा सवाल उपस्थित केला आहे.
व्हीआयपी दौऱ्यासाठी प्रशासन पूर्णपणे झुकलेले असताना, सामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजा व आपत्कालीन सेवांकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे. लोकशाहीत जनतेच्या सुरक्षिततेपेक्षा कार्यक्रमांना अधिक महत्त्व दिले जात असल्याची तीव्र नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत.
गडचिरोलीसारख्या दुर्गम व संवेदनशील जिल्ह्यात अशा प्रकारचा अव्यवस्थापनाचा फटका थेट जनतेला बसत असल्याने, भविष्यात व्हीआयपी दौऱ्यांचे नियोजन करताना आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र ग्रीन कॉरिडॉर, सुयोग्य ट्रॅफिक व्यवस्थापन व नागरिकांना पूर्वसूचना देणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे आज प्रत्यक्ष दौऱ्याच्या दिवशीही शहरातील मुख्य चौकांमधील वाहतूक ३० मिनिटांहून अधिक काळ थांबविण्यात आली. यामुळे शहरात ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. उन्हात वाहनधारकांना रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले. यामध्ये रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक कामासाठी निघालेल्या नागरिकांचेही हाल झाले.
आरमोरी रोडवरील ‘यूआयटी’ परिसरात हा सोहळा पार पडणार आहे. शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा असला, तरी जिल्हा प्रशासनाच्या अतिरेकी नियोजनामुळे या आनंदावर विरजण पडले. “आपल्याच पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सामान्य जनतेला दरवेळेस वेठीस का धरले जाते” असा संतप्त सवाल आता गडचिरोलीकर विचारत आहेत. एकूणच, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याने जिल्ह्याला शैक्षणिक संस्था दिली असली, तरी सुरक्षेच्या नावाखाली झालेल्या या कोंडीने सर्वसामान्यांमधून रोष व्यक्त होत आहे.