छत्तीसगड सीमेवरील तुमरकोठीत २४ तासांत पोलीस ठाण्याची उभारणी, सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी २०२३ पासूनचे नववे ठाणे
गडचिरोली पोलीस दलाने छत्तीसगड सीमेवरील तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत १००० जवानांच्या सुरक्षेत नवीन पोलीस ठाणे उभारून नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात प्रशासकीय पकड मजबूत करत सुरक्षा पोकळी यशस्वीपणे भरून काढली आहे.
नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात ‘खाकी’चा सर्जिकल स्ट्राईक; एका दिवसात उभे केले पोलीस ठाणे!…
गडचिरोली : नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्याजाणाऱ्या अतिदुर्गम आणि संवेदनशील भागात आपली पकड मजबूत करत, गडचिरोली पोलीस दलाने शुक्रवारी एटापल्ली तालुक्यातील तुमरकोठी येथे नवीन पोलीस ठाण्याची स्थापना केली. विशेष म्हणजे, तब्बल १००० हून अधिक जवानांच्या सुरक्षेत आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीने अवघ्या २४ तासांत हे पोलीस ठाणे उभारून प्रशासनाने त्या भागातील सुरक्षा पोकळी भरून काढली आहे..
छत्तीसगड सीमेपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या या भागाला आता सुरक्षेचे कवच मिळाले असून, २०२३ पासून सुरक्षा पोकळी भरून काढण्याच्या मोहिमेतील हे नववे पोलीस ठाणे ठरले आहे. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठाण्याचे लोकार्पण करण्यात आले
तुमरकोठी सारख्या दुर्गम भागात पायाभूत सुविधा पोहोचवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, १०५० मनुष्यबळ, ४ जेसीबी, २ पोकलेन आणि २५ ट्रकच्या साहाय्याने एका दिवसात १२ पोर्टा कॅबिन, वायफाय सुविधा, आरओ प्लांट आणि मोबाईल टॉवर सज्ज करण्यात आले. सुरक्षेसाठी येथे सी-६० कमांडो, सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
तुमरकोठी पोलीस ठाण्याची स्थापना ही या भागातील आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. या नव्या केंद्रामुळे आता परिसरात रस्ते बांधकामे, एसटी बस सेवा आणि शासकीय योजना पोहोचवणे सुलभ होणार आहे. उद्घाटनानिमित्त आयोजित जनजागरण मेळाव्यात ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू, शेतीचे साहित्य आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, डीआयजी अंकित गोयल, सीआरपीएफचे डीआयजी अजय कुमार शर्मा व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.