चकमकीत तीन नक्षली ठार : एका महिला नक्षलीचा समावेश
घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठा व नक्षली साहित्य जप्त.
सुकमा / विशेष प्रतिनिधी, दि. 19 : जिल्ह्यात नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षाबलांना मोठे यश मिळाले आहे. जिल्हा राखीव दलाच्या (DRG) जवानांशी झालेल्या चकमकीत 2 एरिया कमिटी मेंबर (ACM) आणि एका महिला नक्षलीसह एकूण 3 इनामी नक्षली ठार झाले आहेत. ठार झालेल्या नक्षलींवर एकूण 12 लाख रुपयांचे इनामी असून कोंटा-किस्टाराम परिसरात दीर्घकाळ सक्रिय होते. नक्षल संघटनेच्या PLGA बटालियन क्रमांक 1 चा कमांडर देवा याच्या शोधासाठी DRG पथकाने शुक्रवारी सकाळी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. याच दरम्यान सकाळी गोलापल्ली पोलीस ठाणे हद्दीतील गोंदीगुडा येथील जंगल व डोंगराळ भागात चकमक उडाली.
या चकमकीत माडवी जोगा उर्फ मुन्ना (जि. नारायणपूर) – ACM, कोंटा एरिया कमिटी (5 लाख इनाम), सोठी बंडी, सिंगनमडगू, किस्टाराम (सुकमा) ACM, किस्टाराम एरिया कमिटी (5 लाख इनाम) तसेच नुप्पो बजनी, टेकलगुडा, जगरगुंडा (सुकमा) -LOS सदस्य, किस्टाराम एरिया कमिटी (2 लाख इनाम) हे नक्षली ठार झाले.
चकमकीनंतर घटनास्थळाची झडती घेतली असता 9 एमएम सर्व्हिस पिस्तूल, 12 बोर भरमार बंदूक, बीजीएल सेल, टिफिन बॉम्ब, मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य तसेच नक्षली कागदपत्रे जप्त करण्यात आली. ठार नक्षल्यांकडून शस्त्रसाठा व नक्षली साहित्य सुरक्षाबळांनी ताब्यात घेतले आहे.
या कारवाईमुळे किस्टाराम व कोंटा परिसरातील नक्षली हालचालींना मोठा धक्का बसला असून, सुरक्षाबळांचा नक्षलविरोधी दबाव अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.