Home Breaking News आलापल्ली येथे चारतास चक्काजाम गणपत तावाडे यांना न्याय देण्यासाठी समाज बांधवाकडून आंदोलन!

आलापल्ली येथे चारतास चक्काजाम गणपत तावाडे यांना न्याय देण्यासाठी समाज बांधवाकडून आंदोलन!

0
44

 

आलापल्ली :फुले-शाहू-आंबेडकर व मान्यवर कांशीराम यांच्या विचारधारेतील ज्येष्ठ कार्यकर्ते गणपतजी तावाडे यांच्या अपघाती निधनानंतर आलापल्ली येथे झालेल्या तीव्र संतापानंतर अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.

दि. ९ डिसेंबर २०२५ रोजी आलापल्लीतील वीर बाबुराव शेडमाके चौक परिसरात रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत असताना मागून आलेल्या दुचाकीस्वाराने गणपत तावाडे यांना धडक दिली होती. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात, त्यानंतर नागपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दि. १८ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ५.२५ वाजता उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

पार्थिव आलापल्ली येथे आणताच संतप्त नागरिक, बहुजन समाज पार्टीसह विविध सामाजिक संघटनांनी न्यायाच्या मागणीसाठी चक्काजाम व ठिय्या आंदोलन सुरू केले होते. चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनात मयताच्या पत्नीही सहभागी झाल्या होत्या.

दरम्यान, पोलिस प्रशासनाने अपघातास कारणीभूत ठरलेल्या पोलीस अंमलदार प्रवीण ब्रम्हनायक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे, मृत्यूनंतर प्रकरणात कलमवाढ करून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, तसेच मयताच्या कुटुंबाला इन्शुरन्स, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर शासकीय योजनांतून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाईल, असे लेखी व तोंडी आश्वासन दिले.
या आश्वासनानंतर व संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली. नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसर असल्याने आंदोलन काळात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आर्थिकदृष्ट्या साध्या परिस्थितीतूनही सामाजिक व बहुजन चळवळीत सक्रिय राहिलेले गणपत तावाडे हे प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनाने बहुजन चळवळीतील एक महत्त्वाचा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here