गडचिरोली पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम आणि संवेदनशील भागात मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालत, गडचिरोली पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत आंतरराज्यीय टोळीतील चार आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे धानोरा व मुरुमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोबाईल टॉवर बॅटरी चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये २७ लाख ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात मोबाईल टॉवर चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. यानुसार, पोउपनि. विश्वंबर कराळे आणि पोउपनि. सचिन ठेंग यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी रामपूर, तुमडीकसा, कनगडी, कुटभट्टी आणि तोयागोंदी गावातील वाढत्या घटना लक्षात घेऊन तपासाची चक्रे फिरवली. बालोद (छत्तीसगड) मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, एका संशयित पिकअप वाहनाच्या क्रमांकावरून वाहन मालकाची माहिती मिळाली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली धानोरा, सावरगाव, येरकड आणि मुरुमगाव येथे रात्रकालीन सापळा लावण्यात आला. ३० नोव्हेंबर रोजी येरकड हद्दीतील मोवाड येथून साबीर रमजान मलिक (वय ३९, रा. मवाना, उत्तर प्रदेश), अशोक हरीसींग मोर्या (वय ४९, रा. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), जितेंद्र कुमार लक्समीचंद राठोड (वय २६, रा. जांजगीर, छत्तीसगड), नामदेव रामा कांबळे (वय ४३, रा. भोपाळ, मध्यप्रदेश) या चार आंतरराज्यीय आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून पिकअप चारचाकी वाहन (₹ ५,००,०००/-) आणि एक दुचाकी वाहन (₹ ५०,०००/-), बॅटऱ्या (प्रत्यक्ष जप्ती): ८ नग बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या (₹ ८,००,०००/-) आणि दिल्ली येथून लीनेज कंपनीच्या १३ बॅटऱ्या (₹ १४,००,०००/-), ४ मोबाईल फोन आणि कटर व इतर साहित्य, असा एकूण माणे एकूण २७,७१,०००/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी चौकशीदरम्यान पोमकें सावरगाव हद्दीतील २ टॉवरच्या १६ बॅटऱ्या आणि पोस्टे मुरुमगाव हद्दीतील २ टॉवरच्या १६ बॅटऱ्या, अशा एकूण ३२ बॅटऱ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या बॅटऱ्या त्यांनी दिल्ली येथे विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ०५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपी पोस्टे मुरुमगाव येथील गुन्ह्यात अटकेत असून, इतर सर्व गुन्ह्यांचा तपास गडचिरोली पोलिसांकडून केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक, धानोरा अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. विश्वंबर कराळे (पोमकें सावरगाव), पोउपनि. सचिन ठेंग (पोस्टे मुरुमगाव), पोउपनि. गोरखनाथ सुरासे (पोमकें येरकड) आणि सावरगाव, येरकड व मुरुमगाव येथील पोलीस अंमलदार यांनी केली आहे.