अतिसंवेदनशील कॅम्प गुंडूरवाही येथे भव्य जनजागरण मेळावा, ७४ व्या वाचनालयाचे उद्घाटन व बिरसा मुंडा पुतळ्याचे लोकार्पण
गडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक
रश्मी शुक्ला यांनी ०९ डिसेंबर रोजी जिल्ह्याच्या अतिसंवेदनशील भागाचा दौरा केला. त्यांनी नव्याने स्थापन झालेल्या पोलीस मदत केंद्र फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे भेट देऊन अभियानाच्या तयारीची पाहणी केली, तसेच पोलीस दलाच्या माध्यमातून येथील नागरिकांशी संवाद साधत विश्वास निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या आणि २३ नोव्हेंबर २०२५ रोजी नव्याने स्थापन झालेल्या फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य जनजागरण मेळावा पार पडला. या मेळाव्यात ५०० हून अधिक नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठीची भांडी, शिलाई मशिन, ब्लँकेट, कपडे, साड्या, चप्पल आणि शालेय विद्यार्थ्यांना सायकल, बॅग, क्रिकेट किट यांसारख्या विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. त्यांनी नागरिकांशी संवाद साधताना सांगितले की, “या नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. येत्या काळात आम्ही माओवाद संपवून गडचिरोली जिल्ह्याचा विकास करू.”
उपविभाग हेडरी अंतर्गत अतिसंवेदनशील गर्देवाडा येथे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते गडचिरोली पोलीस दलाच्या ‘एक गाव, एक वाचनालय’ या उपक्रमा अंतर्गत ७४ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार आणि महिलांना शिक्षणासह बौद्धिक कलागुणांना वाव मिळावा, तसेच स्पर्धा परीक्षांविषयी ओढ निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. यात विद्यार्थी व स्थानिक नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. या वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका आणि सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गर्देवाडा येथे रश्मी शुक्ला यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. हा पुतळा लोकसहभागातून आणि पोमकें गर्देवाडा येथील अधिकारी व अंमलदारांच्या सहभागातून तयार करण्यात आला आहे. या दौऱ्यादरम्यान उपपोस्टे लाहेरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते पार पडले. सर्व सोयी-सुविधांनी युक्त असलेल्या या इमारतींमुळे अतिदुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना मोठा फायदा होणार आहे.
या महत्त्वपूर्ण दौऱ्यावेळी पोलीस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी कार्तिक मधीरा, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी हेडरी योगेश रांजणकर व इतर अधिकारी उपस्थित होते.