Home Breaking News किरकोळ वादाचे भीषण रूप! मुलाच्या काठीहल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू

किरकोळ वादाचे भीषण रूप! मुलाच्या काठीहल्ल्यात वडिलांचा जागीच मृत्यू

0
15

गडचिरोलीत खळबळ; मद्यधुंद अवस्थेत मुलाने केली हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गडचिरोली | 

घरगुती किरकोळ वादातून मुलाने स्वतःच्या वडिलांवर काठीने प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील लगाम चेक येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी मुलाला तात्काळ ताब्यात घेतले आहे.

मृत व्यक्तीचे नाव नारायण आशा टेकाम (वय ६१) असे असून आरोपी मुलगा विजय नारायण टेकाम (वय ४०) यानेच हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ जूनच्या रात्री घरगुती कारणावरून बाप-लेकामध्ये वाद झाला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विजयने रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने नारायण टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर विजयने गावकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी वडील खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, साक्षीदारांचे जबाब आणि प्राथमिक तपासातून संशयिताची कसून चौकशी केली असता त्याचा खोटेपणा उघड झाला. अखेर विजयने गुन्ह्याची कबुली दिली.

घटनेची माहिती मिळताच अहेरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून हत्या प्रकरणी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.

स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाप-लेकामध्ये यापूर्वीही अनेकदा वाद होत असत. नारायण टेकाम यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. विवाहित मुलगी सासरी राहत असून दोन मुलांसह ते लगाम चेक येथे राहत होते. धाकटा मुलगा कामानिमित्त भामरागड तालुक्यात गेला असल्याने घटनेच्या वेळी घरात नारायण आणि विजय हे दोघेच उपस्थित होते.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नातेसंबंधातील वाढती दुरावस्था आणि मद्यपानामुळे उद्भवणाऱ्या गंभीर घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

 

• घरगुती वादातून मुलाने वडिलांची हत्या

• डोक्यावर काठीने वार केल्याने जागीच मृत्यू

• आरोपीने सुरुवातीला अपघाताचा बनाव रचण्याचा प्रयत्न

• पोलिस चौकशीत सत्य उघड; आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली

• अहेरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here