
गडचिरोली |
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) गडचिरोली जिल्ह्याची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी सकाळी मा. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या चामोर्शी रोड येथील निवासस्थानी उत्साहात पार पडली.
प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनिल तटकरे यांच्या निर्देशानुसार राज्यभर सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेत पक्षाची प्रभावी भूमिका राहावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथ लेव्हल एजंट (BLA) व बूथ लेव्हल ऑफिसर नियुक्तीबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत कोरची, कुरखेडा, देसाईगंज (वडसा), आरमोरी, गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी तालुक्यातील पक्षाचे तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बूथस्तरावरील संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाची सक्षम आणि सक्रिय यंत्रणा उभारून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याची रणनीती आखण्यात आली. तसेच बूथ लेव्हल एजंटच्या जबाबदाऱ्या, मतदार यादी पुनरिक्षणातील भूमिका आणि पक्ष संघटन विस्ताराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाच्या ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल मतदार पुनरिक्षण मोहिमेत पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदारांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
“प्रत्येक बूथ मजबूत, तर पक्ष मजबूत” हा संदेश देत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
SIR मोहिमेत सक्रिय सहभागासाठी पक्षाची रणनिती निश्चित
मतदार यादी पुनरिक्षणात पक्ष कार्यकर्त्यांची महत्त्वाची भूमिका
प्रत्येक मतदान केंद्रावर BLA नियुक्तीला गती देण्याचे निर्देश