![]()
वनकायद्यांचे उघड उल्लंघन; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
📰 गडचिरोली — एटापल्ली वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड, वन्यजीव शिकारी तसेच अवैध उत्खननाचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मौल्यवान वनसंपत्ती आणि दुर्मिळ वन्यजीवांसाठी प्रसिद्ध असलेल्या या जंगलात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तस्कर आणि शिकारी टोळ्या सक्रिय झाल्याचे चित्र आहे.
भामरागड वनविभाग अंतर्गत आलापल्ली परिसरात नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईत एटापल्ली तालुक्यातील उडेरा येथील आरोपींकडून राज्य पक्षी हरियल, दयाळ (रॉबिन) तसेच राज्य प्राणी शेकरू (उडणारी खार) यांची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे वन्यजीव संरक्षणावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972, भारतीय वन अधिनियम 1927, वनसंवर्धन अधिनियम 1980, तसेच खनिज व खनिज (विकास व नियमन) अधिनियम 1957 यांसारख्या कडक कायद्यांनंतरही एटापल्ली वनपरिक्षेत्रात अवैध वृक्षतोड आणि उत्खननाचे प्रकार सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जंगलातील मौल्यवान लाकूड व वनसंपत्तीची चोरी, तसेच वन्यजीवांची शिकार सातत्याने सुरू असून, याकडे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. उपक्षेत्रांमध्ये वारंवार होणाऱ्या या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यात अपयश येत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आनंद दहागावकर यांनी मुख्य वनसंरक्षक, वनवृत्त गडचिरोली यांच्याकडे निवेदन सादर करून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून विभागीय कारवाई करावी, तसेच जंगल संरक्षणासाठी विशेष पथके व प्रभावी उपाययोजना तात्काळ राबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
एटापल्ली जंगलातील वाढत्या बेकायदेशीर कारवायांमुळे पर्यावरणीय संतुलन धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात असून, प्रशासनाने तात्काळ कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
👉 जंगल वाचवायचे की दुर्लक्ष करायचे? — प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष!