![]()
वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन; वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
गडचिरोली — मौल्यवान वनस्पती आणि दुर्मिळ वन्यजीवांसाठी ओळखल्या जाणाऱ्या एटापल्ली वनपरिक्षेत्रात सध्या अवैध वृक्षतोड व शिकारीचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उन्हाळ्याच्या काळात तस्कर आणि शिकारी टोळ्या अधिक सक्रिय होत असताना, वनविभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
भामरागड वनविभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या क्षेत्रात अलीकडेच आलापल्ली येथील खंड क्रमांक 10 मध्ये करण्यात आलेल्या शिकारी हे उडेरा परिसरातील असून आलापल्ली वनविभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान आरोपींकडून राज्य पक्षी हरियल, दयाळ (रॉबिन) पक्षी तसेच राज्य प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेकरू (उडणारी खार) यांची शिकार केल्याचे उघड झाले आहे. ही बाब वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात आहे.
वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित असलेल्या या प्रजातींची शिकार करणे हा गंभीर गुन्हा असून, दोषींवर कडक कारवाईची तरतूद आहे. तसेच, वनसंवर्धन अधिनियम 1980 व भारतीय वन अधिनियम 1927 नुसार कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड करणे कायद्याने दंडनीय आहे. तरीही एटापल्ली वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड सुरू असल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, जंगलातील मौल्यवान लाकूड आणि वनसंपत्तीची चोरी तसेच वन्यजीवांची शिकार मोठ्या प्रमाणात सुरू असून, याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या परिसरातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, वनविभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच जंगल संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.