अहेरी येथे सहा ठिकाणी होणार महाराजस्व समाधान शिबिर; लाभघेण्याचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांचे आवाहन
अहेरी: शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा क्रमांक १) अंतर्गत अहेरी तालुक्यात तब्बल सहा ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे.
पुढे बोलताना छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रलंबित महसुली प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रशासन सज्ज असून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व वेगवान करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. त्यांनी शिबिरांचे सुयोग्य नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत सेवा पोहोचविण्याच्या सूचना दिल्या. या माध्यमातून भोगवटदार वर्ग-२ जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतर, ‘जिवंत सातबारा’ मोहिमेद्वारे नोंदी दुरुस्ती, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे आदेश वितरण, ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टे वाटप, पाणंद रस्त्यांना मान्यता, क्यूआर संकेतांकयुक्त सातबारा उतारा जनजागृती, लोकसेवा हक्क कायद्यानुसार सेवा, संगणकीकृत मोजणी, शेतकरी नोंदणी प्रकल्प, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना तसेच अकृषिक रूपांतरण प्रक्रियेतील सुधारणा आदी समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे अभियान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर राबविण्यात येणार असून अहेरी तालुक्यात ७ मार्च रोजी खमणचेरु, १४ मार्च रोजी पेरमिली, १० एप्रिल रोजी कमलापूर, १७ एप्रिल रोजी जिमलगट्टा, ८ मे रोजी अहेरी आणि १५ मे रोजी आलापल्ली येथे असे सहा ठिकाणी या पहिल्या टप्प्यातील शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्याअनुषंगाने ७ मार्च रोजी खमणचेरू येथे पहिले समाधान शिबिर संपन्न होणार असून सर्व विभागांना सूचना दिली आहे. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याचे सक्त निर्देश तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिली आहे.