
या घटनेनंतर स्थानिक आमदार डॉ. नरोटे यांनीही शाळेला भेट देऊन येथील दुरावस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली असता, धक्कादायक बाबी समोर आल्या.
गडचिरोली : भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील
शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत घडलेल्या विषबाधा प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत शाळेचे मुख्याध्यापक डी. जी. रापंजी आणि अधीक्षक एम. एम. पाटील यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच, अधिक्षिका व पाच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याचे आदेश भामरागडचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी दिले आहेत.
२८ जानेवारी रोजी लाहेरी आश्रमशाळेतील जवळपास ७० विद्यार्थ्यांना दुपारच्या जेवणातून विषबाधा झाली होती. मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या विद्यार्थ्यांना तातडीने लाहेरी, भामरागड आणि अहेरी येथील रुग्णालयांत हलवण्यात आले होते. या घटनेनंतर स्थानिक आमदार डॉ. नरोटे यांनीही शाळेला भेट देऊन येथील दुरावस्थेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला होता. प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी प्रत्यक्ष शाळेची पाहणी केली असता, धक्कादायक बाबी समोर आल्या.
शाळेच्या स्वयंपाकगृहात कमालीची अस्वच्छता होती. इतकेच नव्हे तर, विद्यार्थ्यांना देण्यासाठी ठेवलेली फळे, धान्य व भाजीपाला सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. निलंबन काळात मुख्याध्यापक रापंजी यांचे मुख्यालय जांबिया (एटापल्ली), तर अधीक्षक पाटील यांचे मुख्यालय हालेवारा येथे ठेवण्यात आले आहे.
