Home Breaking News निवासी शाळेतील सफाई कर्मचाऱ्याचा विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला: पालकांची तक्रार, पोलिसांनी घेतले ताब्यात

निवासी शाळेतील सफाई कर्मचाऱ्याचा विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला: पालकांची तक्रार, पोलिसांनी घेतले ताब्यात

0
49

 

अहेरी : तालुका मुख्यालयापासून फक्त हाकेच्या अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळेत एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी अजय रमेश चंद्रागिरीवार नामक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रत्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा सुरू केली. अहेरी तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथे देखील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा चालवली जात आहे. २०११ पासून सुरू असलेल्या या शाळेत ५वी ते १०वीपर्यंत शिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय आहे.

शनिवारी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पालकांना येथील सफाई कामगार अजय रमेश चंद्रागिरीवार याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर संतप्त पालकांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, मोबाईल चोरीचा आरोप करत त्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची माहिती पालकांनी दिली.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये एकच दहशत निर्माण झाली असून विद्यार्थी धास्तावलेले दिसून आले. शाळेत भेट दिली असता येथे जबाबदार व्यक्ती कुणीच आढळले नाही. शाळेचे मुख्याध्यापक यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केले असता त्यांचा मोबाईल बंद आढळला. शनिवारी अर्धा वेळ शाळा असली तरी वसतिगृह असल्याने येथे अधीक्षक, अधीक्षिका, पहारेकरी, शिपाई आदी कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी कर्मचारी आढळले नाही. मोबाईल चोरीचा आरोप सिद्ध होण्याआधीच निष्पाप मुलांना अमानुष मारहाण करणे निंदनीय बाब असून चतुर्थ श्रेणी कर्मचारी विद्यार्थ्यांना कसे काय मारहाण करू शकतात? असा सवाल पालकांनी उपस्थित केला. त्यामुळे शालेय प्रशासन वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.

वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळेत मोबाईल चोरीचा आरोप करत येथील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित कर्मचारी अजय चंद्रगिरीवार याला ताब्यात घेतले आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

-हर्षल एकरे, ठाणेदार अहेरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here