अहेरीत रस्ता सुरक्षा बाइक रॅली; वाहतुकीच्या नियमांबाबत जागृती
गडचिरोली : महाराष्ट्र पोलिस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान ‘रेझिंग डे’ सप्ताह साजरा करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अहेरी येथे रस्ता सुरक्षा बाइक रॅली काढून जनजागृती करण्यात आली.
अहेरीचे अप्पर पोलीस अधीक्षक, कार्तिक उपविभागीय पोलीस उपमुख्यालय प्राणहिता, उपविभागीय पोलिस अधिकारी कोकाटे व पोलिस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या उपस्थितीत सकाळी प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली अहेरीतील राजे विश्वेश्वरराव महाराज चौक, मशीद चौक मार्गे पुन्हा प्राणहिता पोलिस उपमुख्यालयात समाप्त झाली. रस्ता सुरक्षा बाइक रॅलीत अपर पोलिस अधीक्षक कार्यालय अहेरी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अहेरी, पोलिस उपमुख्यालय प्राणहिताचे कर्मचारी सहभागी झाले.
अशी केली जनजागृती
या रॅलीत सहभागी पोलिस अधिकारी व अंमलदारांनी हेल्मेटचा वापर करत वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश दिला. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. रेझिंग डे सप्ताहांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलिस दलाची माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा, व्यसनमुक्तीविषयक जनजागृती फलक, स्वच्छता अभियान तसेच इतर सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे.