Home Breaking News गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचा आंतरराष्ट्रीय सुवर्णपराक्रम

गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्याचा आंतरराष्ट्रीय सुवर्णपराक्रम

0
39

 

Oplus_16908288

साऊथ एशियन इंटरनॅशनल बॉल बॅडमिंटन स्पर्धेत विनय कोवे याने पटकावले सुवर्णपदक

गडचिरोली : गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोलीचामाजी विद्यार्थी विनय कोवे याने साऊथ एशियन इंटरनॅशनल बॉल बॅडमिंटन स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या दैदीप्यमान यशामुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावला असून गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या यशोगाथेत आणखी एक सुवर्णपान जोडले गेले आहे.

सदर साऊथ एशियन इंटरनॅशनल बॉल बॅडमिंटन स्पर्धेत भारतासह दक्षिण आशियातील विविध देशांतील नामांकित व अनुभवी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत कठीण, चुरशीचे आणि कौशल्यपूर्ण सामने खेळत विनय कोवे याने आपल्या उत्कृष्ट तंत्रज्ञान, वेगवान खेळ, अचूक फटके आणि मानसिक ताकदीच्या जोरावर प्रत्येक सामन्यात विजय मिळवला. अंतिम सामन्यातही त्याने प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व राखत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

विनय कोवे याने गोंडवाना सैनिकी विद्यालयात शिक्षण घेत असतानाच क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले होते. विद्यालयातील शिस्तबद्ध वातावरण, नियमित व्यायाम, क्रीडाशिक्षकांचे मार्गदर्शन, तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धांचा अनुभव यामुळेच त्याच्या खेळातील सातत्य आणि आत्मविश्वास अधिक दृढ झाला.

या यशाबद्दल भगवंतराव मेमोरिअल शिक्षण संस्थेचे सचिव धर्मरावबाबा अत्राम अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर (अत्राम), गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे शिक्षकवृंद, क्रीडाशिक्षक भूपेंद्र चौधरी, माजी विद्यार्थी संघ तसेच विद्यमान विद्यार्थ्यांनी विनय कोवे याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. “विनयचे हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण विद्यालयासाठी अभिमानास्पद आहे. त्याच्या यशातून ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकण्याची संधी मिळू शकते, हा सकारात्मक संदेश समाजात जात आहे,” असे गौरवोद्‌गार यावेळी काढण्यात आले.

विनय कोवे याच्या या सुवर्णपदकामुळे गोंडवाना सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कीडा क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी तो प्रेरणास्थान ठरत आहे. भविष्यातही तो राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करत अशीच गौरवास्पद कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here