मेडाराम यात्रेवरून परतताना भाविकांच्या जीपचा भीषण अपघात : चालकासह नऊ जण जखमी
Gadchiroli: सिरोंचा तेलंगणातील मेडाराम येथील यात्रेतून दर्शन करून गावाकडे परतणाऱ्या अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील भाविकांच्या जीपला वाटेत भीषण अपघात झाला. हा अपघात ३० जानेवारी रोजी पहाटे तेलंगणातील जयशंकर भुपापल्ली जिल्ह्यात घडला. या अपघातात चालकासह एकूण नऊ जण जखमी झाले असून चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथील भाविक जीप क्रमांक एमएच ३३ ए- ३९५५ ने मेडाराम येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून घराकडे परतीचा प्रवास सुरू असतानाच, पहाटेच्या सुमारास समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या जीपला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील घटनास्थळी काही वेळातच नागरिकांची मोठी गर्दी जमली.
चालक कोमात, नऊ जणांवर उपचार सुरू –
या अपघातात जीप चालक वसंत चव्हाण यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ असून ते सध्या कोमात असल्याचे सांगण्यात येत आहे. चालकासह गाडीतील अन्य भाविकांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत. सर्व जखमींना तातडीने भुपापल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नातेवाईकांची तेलंगणाकडे धाव
अपघाताची माहिती मिळताच अहेरी व छल्लेवाडा परिसरातील नातेवाईकांनी तात्काळ तेलंगणाकडे धाव घेतली. भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांना अपघाताची माहिती मिळाल्याने अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. जखमी भाविकांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.