![]()
अहेरी : तालुका मुख्यालयापासून फक्त हाकेच्या अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळेत एका चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याकडून विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पालकांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिसांनी अजय रमेश चंद्रागिरीवार नामक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुला-मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने प्रत्येक तालुक्यात एक अशी शासकीय निवासी शाळा सुरू केली. अहेरी तालुका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांगेपल्ली येथे देखील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा चालवली जात आहे. २०११ पासून सुरू असलेल्या या शाळेत ५वी ते १०वीपर्यंत शिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे याच ठिकाणी मुला-मुलींसाठी स्वतंत्र निवासाची सोय आहे.
शनिवारी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलेल्या पालकांना येथील सफाई कामगार अजय रमेश चंद्रागिरीवार याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर संतप्त पालकांनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विशेष म्हणजे, मोबाईल चोरीचा आरोप करत त्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची माहिती पालकांनी दिली.

वांगेपल्ली येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळेत मोबाईल चोरीचा आरोप करत येथील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची तक्रार प्राप्त होताच संबंधित कर्मचारी अजय चंद्रगिरीवार याला ताब्यात घेतले आहे. गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-हर्षल एकरे, ठाणेदार अहेरी