![]()
चंद्रपूर : ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या जोरावर जिल्हास्तरावर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोवारी येथे पार पडलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत आणि आलेंगा येथील कबड्डी स्पर्धेत ‘लॉयड्स’च्या संघांनी अजिंक्यपद पटकावून क्रीडा क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.
गोवारी येथे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण १६ नामवंत संघांनी सहभाग नोंदवला होता. सुरुवातीपासूनच उत्कृष्ट समन्वय आणि आक्रमक खेळ करणाऱ्या लॉयड्स व्हॉलीबॉल संघाने अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामन्यात आपल्या प्रतिस्पर्ध्यावर १५-१० अशा गुणांनी मात करत लॉयड्स संघाने विजेतेपदाचा करंडक उंचावला. दुसरीकडे, आलेंगा येथे आयोजित जिल्हास्तरीय ग्रामीण कबड्डी स्पर्धेत पारसलगोंडी येथील लॉयड्स ग्रामीण कबड्डी संघाने आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत तब्बल ४५ संघांनी सहभाग घेतला होता. मात्र, लॉयड्सच्या संघाने सुरुवातीच्या सामन्यापासून ते अंतिम फेरीपर्यंत ‘अपराजित’ राहण्याचा पराक्रम केला आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.

केवळ शहरापुरते मर्यादित न राहता, दुर्गम भागातील क्रीडा प्रतिभा शोधणे आणि युवकांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा अकादमीचा मुख्य उद्देश आहे. एकाच वेळी दोन महत्त्वाच्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळाल्याने खेळाडूंसह स्थानिक क्रीडाप्रेमींचा आत्मविश्वास उंचावला आहे. अकादमीच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणारे खेळाडू घडतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.