Home Breaking News गडचिरोली पोलीस दलातील ३१ जवानांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर

गडचिरोली पोलीस दलातील ३१ जवानांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर

0
30

 

४० नक्षल्यांना यमसदणी धाडणाऱ्या गडचिरोली पोलीस दलातील ३१ जवानांना ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर


गडचिरोली : नक्षलवादाच्या दहशतीत प्राणांची बाजी
लावून दुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाच्या शिरपेचात प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाचा तुरा रोवला गेला आहे.

सन २०१८ मध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध ‘बोरीया-कसनासूर’ मोहिमेत शौर्य दाखवणाऱ्या ३१ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना राष्ट्रपतींचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. देशात जाहीर झालेल्या एकूण १२१ शौर्य पदकांपैकी ३१ पदके एकट्या गडचिरोलीच्या जवानांना मिळाल्याने जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरक्षिततेसाठी तैनात असलेल्या दलाचे मनोबल उंचावले आहे.

२२ एप्रिल २०१८ रोजी भामरागड तालुक्यातील बोरीया-कसनासूरच्या घनदाट जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या एकाच मोहिमेत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश आले होते. नक्षलविरोधी अभियानातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी कारवाई मानली जाते. या मोहिमेत प्रत्यक्ष शौर्य गाजवणारे पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर नैताम, वासुदेव मडावी, विलास पोरतेट, संतोष नैताम यांच्यासह ३१ जवानांच्या कामगिरीची दखल आता राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत या दलाने एकूण ३ शौर्य चक्र आणि २१७ पोलीस शौर्य पदके मिळवून आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.

शौर्य पदकांसोबतच ३९४ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देखील देण्यात आली आहे. यामध्ये कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या १४ शहीद जवानांचाही मरणोत्तर सन्मान करण्यात आला आहे. शहीद झालेल्या ७ हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदी, तर ७ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार पदी मरणोत्तर पदोन्नती देण्यात आली आहे. याशिवाय १० जवानांना त्यांच्या विशेष कामगिरीसाठी वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. यामध्ये ८२ हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक म्हणून, तर ३०२ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती मिळाली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, कार्तिक मधीरा आणि गोकुल राज जी. यांनी या सर्व जवानांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here