Home Breaking News अवघ्या 24 तासात माओवाद्यांच्या राजधानीत पोलीस मदत केंद्राची उभारणी

अवघ्या 24 तासात माओवाद्यांच्या राजधानीत पोलीस मदत केंद्राची उभारणी

0
36

बिनागुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

गडचिरोली : अतिदुर्गम भागातील आदिवासीबांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व नक्षल्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यात भामरागड उपविभागातील बिनागुंडा येथे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. २४ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

लाहेरी उपपोलीस स्टेशनपासून १७किमी व छत्तीसगड सिमेपासून केवळ ८ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता पोलीस मदत केंद्र बिनागुंडा मैलाचा – दगड ठरेल. बिनागुंडा येथे पोलीस मदत केंद्राची उभारण्यासाठी १०५० मनुष्यबळ, ११ जेसीबी, १० ट्रेलर, ५ पोकलेन, ४० ट्रक आदींच्या साहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. येथे पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, ८ पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाइल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, ८ सँन्ड मोर्चा सोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे ४ अधिकारी व ५६ अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप १९, कुसळगाव बी कंपनीचे २ प्लाटून तसेच सीआरपीएफ ९ बटा. डी कंपनीचे (२०० कमांडो) तैनात करण्यात आले आहेत.

यावेळी जनजागरण मेळावा घेऊन बिनागुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील महिलांना साडी, पुरुषांना धोतर, ब्लॅकेट, युवकांना टी-शर्ट, नोटबुक, पेन, स्कूल बॅग, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले. येत्या काळात या भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम व ७ मोबाइल मनोरे उभारण्यात येणार आहेत. गुंडेनूर नाल्यावर पुलाचे बांधकाम व या भागात बससेवा सुरू करण्यात येणार आहे.

शुभारंभाप्रसंगी विशेष पोलीस
महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ ९ बटा. कमांडंट शंभू कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते व बिनागुंडा पोलीस मदत केंद्राचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. रोहन पाटील, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here