हेडरी येथील अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधेमुळे वाचले पारसलगुंडीच्या महिलेचे प्राण; १५ दिवस मृत्यूशी झुंज यशस्वी
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात प्रगतआरोग्य सुविधांचा अभाव अनेकदा जीवावर बेततो, मात्र हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. ‘ऑर्गेनोफॉस्फरस’ विषबाधेमुळे मृत्यूच्या दारात पोहोचलेल्या पारसलगुंडी येथील एका मध्यमवयीन महिलेला १५ दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर यशस्वी उपचार करून जीवदान देण्यात आले आहे.
२८ डिसेंबर २०२५ रोजी या महिलेला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला श्वास घेण्यास तीव्र त्रास होत होता आणि फुफ्फुसांमध्ये गंभीर गुंतागुंत निर्माण झाली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती ही ‘ऑर्गेनोफॉस्फरस’ विषबाधा असल्याचे ओळखून तातडीने आपत्कालीन जीवनरक्षक उपचार सुरू केले.
रुग्णाची प्रकृती खालावल्यामुळे तिला तातडीने आयसीयूमध्ये हलवून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दीर्घकाळ व्हेंटिलेटरवर राहिल्याने नंतर ‘ट्रॅकिओस्टॉमी’ (घशातून श्वसनमार्ग तयार करणे) करावी लागली. उपचारादरम्यान विषाच्या तीव्रतेमुळे त्यांच्या मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांवर वाईट परिणाम झाला होता. त्यातच त्यांना दोन वेळा ‘सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया’ (हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे) चे झटके आले. मात्र, डॉक्टरांचे सततचे निरीक्षण आणि प्रगत उपचारांमुळे ही गुंतागुंत यशस्वीरित्या हाताळली गेली.
रुग्णाने हळूहळू उपचारांना प्रतिसाद दिला आणि त्या पूर्णपणे धोक्याबाहेर आल्या. या यशस्वी उपचारांचे नेतृत्व डॉ. चेतन (मेडिसिन तज्ज्ञ), डॉ. धीरज (भूलतज्ज्ञ), डॉ. महेंद्र (ईएनटी तज्ज्ञ) यांनी केले. या संपूर्ण प्रक्रियेचे समन्वय वरिष्ठ वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाल रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
रुग्णालय प्रशासनाने एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन आणि संचालिका कीर्ती रेड्डी यांचे आभार मानले आहेत. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि वंचित भागात अत्याधुनिक क्रिटिकल केअर सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच अशा गंभीर रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य होत असल्याचे रुग्णालय अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकृती स्थिर झाल्यानंतर या महिलेला सुखरूप घरी सोडण्यात आले आहे.