Home Breaking News वडसा अंडरपासवर वाहतुकीला ब्रेक!

वडसा अंडरपासवर वाहतुकीला ब्रेक!

0
10

 

रस्ता दुरुस्तीसाठी २ जुलैपर्यंत मार्ग बंद; अत्यावश्यक सेवांनाच मुभा

गडचिरोली, दि. १०  : वडसा रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ (रेल्वे बोगदा अंडरपास) मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आल्याने या मार्गावरील वाहतुकीला तब्बल २२ दिवसांचा ब्रेक लागला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी यासंदर्भात आदेश जारी केले असून, १० जून ते २ जुलै २०२६ या कालावधीत मार्गावरील वाहतूक प्रतिबंधित राहणार आहे.

वडसा रेल्वे स्थानकाजवळील अंडरपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात येथे पाणी साचत असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनुसार अंडरपासच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाच्या आदेशानुसार, या कालावधीत प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, महावितरण, रस्ते दुरुस्ती तसेच इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशावर बंदी राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा १९८८, भारतीय दंड संहिता १८६० आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नागरिकांनी घ्यावी खबरदारी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची सुरक्षितता आणि वाहतुकीची सुरळीतता सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नागरिकांनी नियोजित प्रवास करताना पर्यायी मार्गांची निवड करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. :::

खड्डे, पाणी साचणे आणि अपघातांचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय

रेल्वे विभागाच्या विनंतीनंतर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here