Home Breaking News रंगकामाच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार; चामोर्शी हादरले

रंगकामाच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार; चामोर्शी हादरले

0
13

७ वर्षीय निष्पाप बालिकेवर अमानुष कृत्य; आरोपीला तत्काळ अटक, पोक्सोअंतर्गत गुन्हा

चामोर्शी : तालुक्यात बाललैंगिक अत्याचाराची एक अतिशय संतापजनक आणि घृणास्पद घटना सोमवारी (८ जून) उजेडात आली आहे. नव्या घराच्या बांधकामानंतर रंगकाम (पेंटिंग) करण्यासाठी आलेल्या एका २५ वर्षीय नराधमाने ७ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीला एकांतात गाठून तिच्यावर अत्याचार केला. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण चामोर्शी परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रज्वल उर्फ नारु सदाशिव भांडेकर (२५, रा. चामोर्शी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पीडित बालिकेच्या कुटुंबीयांनी नुकतेच एक नवे घर बांधले असून, सध्या त्याच्या स्लॅबवर रंगकामाचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे ही सातवर्षीय चिमुरडी घराच्या गच्चीवर खेळत होती. यावेळी तिथे रंगकाम करत असलेल्या प्रज्वल भांडेकर याने आजूबाजूला कोणीही नसल्याची संधी साधली. त्याने चिमुरडीला एकांतात गाठून तिच्यावर अत्याचार केला.

घटनेनंतर पीडित बालिकेला शारीरिक त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांच्या हे लक्षात आले. त्यांनी तात्काळ तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. वैद्यकीय अहवालात बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट होताच, पीडितेच्या मातेने तात्काळ चामोर्शी पोलीस ठाणे गाठून नराधमाविरुद्ध तक्रार नोंदवली.

घटनेचे गांभीर्य ओळखून चामोर्शी पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी प्रज्वल भांडेकर याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील नवीन कलमांनुसार कलम ६४(१), ६५(२) आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा, २०१२) मधील कलम ४ व ६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक डोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here