Home Breaking News “सहा महिने राबले जंगलात, पण मजुरीचा पत्ता नाही; वनमजुरांचा संताप, आंदोलनाचा इशारा”

“सहा महिने राबले जंगलात, पण मजुरीचा पत्ता नाही; वनमजुरांचा संताप, आंदोलनाचा इशारा”

0
34

डिसेंबरपासून थकीत मजुरीसाठी आलापल्ली वनविभागावर प्रश्नचिन्ह; उपवनसंरक्षकांकडे वनमजुरांचे निवेदन

गडचिरोली | 

आलापल्ली वनविभागांतर्गत विविध वनकामांमध्ये जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या शेकडो वनमजुरांना गेल्या डिसेंबर महिन्यापासून आजतागायत मजुरी मिळालेली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल सहा महिन्यांपासून मजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या मजुरांनी अखेर संतप्त होत उपवनसंरक्षक, आलापल्ली वनविभाग यांना निवेदन सादर करून थकीत मजुरी तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे.

मजुरांनी दिलेल्या निवेदनानुसार, आलापल्ली वनपरिक्षेत्रात थिनिंग कामांतर्गत वूड फेलिंग, लठ्ठे खिचाई, नग घडविणे, मोजमाप करणे, इमारती नग तयार करणे, बीट कटाई, बीट वाहतूक यासह विविध कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मात्र संबंधित कामांचा मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही. परिणामी अनेक मजुरांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले असून उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

“काम आम्ही केले, पण मजुरी कुठे गेली?” असा सवाल उपस्थित करत मजुरांनी वनविभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. वाढत्या महागाईच्या काळात घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक गरजा आणि कर्जाचे हप्ते भागविताना मजुरांना मोठ्या आर्थिक विवंचनेचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

वनमजुरांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही मजुरीबाबत ठोस उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून थकीत मजुरी अदा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, निवेदनावर मोठ्या संख्येने वनमजुरांच्या स्वाक्षऱ्या असून, लवकरात लवकर मजुरी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील मजुरांनी दिला आहे. त्यामुळे वनविभाग या प्रश्नावर काय भूमिका घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

“मजुरीअभावी चुली विझण्याची वेळ”

सहा महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने अनेक वनमजुरांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते दैनंदिन गरजांपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम होत असल्याची खंत मजुरांनी व्यक्त केली. “कामाचा मोबदला हा आमचा हक्क आहे, उपकार नाहीत,” अशी भावना मजुरांमधून व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here