Home Breaking News “पूल नसल्याने दरवर्षी जीव धोक्यात; हजारो नागरिकांचा प्रशासनाला इशारा, कर्जेली-विराडघाट-रमेशगुडम मार्गाच्या विकासाची...

“पूल नसल्याने दरवर्षी जीव धोक्यात; हजारो नागरिकांचा प्रशासनाला इशारा, कर्जेली-विराडघाट-रमेशगुडम मार्गाच्या विकासाची जोरदार मागणी”

0
12

कायमस्वरूपी पुलिया व डांबरी रस्त्यासाठी ग्रामस्थांचे निवेदन; पावसाळ्यात संपर्क तुटत असल्याने नागरिक संतप्त

गडचिरोली !

सिरोंचा तालुक्यातील कर्जेली, विराडघाट, रमेशगुडम, कोर्ला, किस्ट्यापल्ली, सोमनपल्ली तसेच परिसरातील गावांतील हजारो नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात जीवघेण्या परिस्थितीचा सामना करावा लागत असून, कर्जेली-बीरारडघाट व कर्जेली-रमेशगुडम नाल्यांवर कायमस्वरूपी पुलिया बांधण्यात याव्यात तसेच जिमलगट्टा-देचलीपेठा-कर्जेली-सोमनपल्ली मार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे.

चंद्रशेखर पुलाम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींना दिलेल्या निवेदनात परिसरातील गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. दरवर्षी पावसाळ्यात इंद्रावती नदी व नाल्यांना पूर आल्याने कर्जेली-विराडघाट व कर्जेली-रमेशगुडम मार्गावरील संपर्क पूर्णपणे तुटतो. परिणामी विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, मजूर आणि रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, पूराच्या काळात नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद पडते. अनेक वेळा गंभीर रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे अशक्य होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे आर्थिक व सामाजिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

याशिवाय जिमलगट्टा-देचलीपेठा-कर्जेली-सोमनपल्ली हा महत्त्वाचा मार्ग अत्यंत खराब अवस्थेत असून रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. पावसाळ्यात हा मार्ग चिखलमय व धोकादायक बनत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे या मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

निवेदनाद्वारे कर्जेली-विराडघाट व कर्जेली-रमेशगुडम नाल्यांवर सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीस सक्षम अशा मजबूत पुलियांचे बांधकाम, आवश्यक निधीची मंजुरी, रस्त्याचे तातडीने डांबरीकरण, संबंधित विभागामार्फत स्थळ पाहणी तसेच काम पूर्ण होईपर्यंत पर्यायी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नागरिकांनी सामूहिक स्वाक्षऱ्या करून प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

“पूल आणि रस्ता नसल्याने विकास खुंटला”

कर्जेली, बीराडघाट, रमेशगुडम , किसट्यापल्ली व परिसरातील गावांचा संपर्क पावसाळ्यात वारंवार तुटत असल्याने आरोग्य, शिक्षण आणि रोजगारावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे पुलिया व डांबरी रस्त्याच्या कामांना प्राधान्याने मंजुरी देऊन दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांचा लाभ द्यावा, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here