Home Breaking News भरधाव चारचाकीच्या भीषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

भरधाव चारचाकीच्या भीषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

0
11

बहिणीला गृहप्रवेशाची पत्रिका देण्यापूर्वीच काळाची झडप; लिसिट हायस्कूलजवळील धोकादायक वळणावर दुर्दैवी अपघात

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेत गुरुवारी (दि. २८ मे) सकाळी धानोरा तालुक्यातील रांगी येथे आणखी एका भीषण अपघाताची भर पडली. भरधाव चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातात नंदू चमरशींग तुलावी (रा. खेडेगाव, मुरुमगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आपल्या लाडक्या बहिणीला नवीन घराच्या गृहप्रवेशाचे निमंत्रण देण्यासाठी ते निघाले होते. मात्र, बहिणीच्या घरी पोहोचण्याआधीच नियतीने त्यांच्यावर घाला घातल्याने तुलावी कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे १०:३० वाजताच्या दरम्यान, नंदू तुलावी हे त्यांच्या एमएच-३३-एबी-१०३९ क्रमांकाच्या दुचाकीने धानोराकडून रांगीच्या दिशेने जात होते. त्याचवेळी रांगीहून धानोराकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने लिसिट हायस्कूलजवळील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर नंदू तुलावी हे दुचाकीवरून दूर फेकले गेले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मृत नंदू तुलावी हे रांगीजवळील कोरेगाव येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे गृहप्रवेशाची पत्रिका देण्यासाठी जात होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेने आनंदावर विरजण पडले आहे. अपघाताची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

घटनेची माहिती मिळताच धानोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अपघातास कारणीभूत ठरलेले चारचाकी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर चालक फरार झाला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहेत.

धोकादायक वळण ठरतंय जीवघेणं !

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, लिसिट हायस्कूलजवळील वळण अत्यंत धोकादायक असून यापूर्वीही येथे अनेक अपघात घडले आहेत. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी वेगमर्यादा फलक, स्पीड ब्रेकर व सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here