![]()
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील असरली पोलीस ठाणे हद्दीत अवघ्या २४ तासांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी युवक आणि युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहिली घटना ९ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास टेकडा मोटला गावात घडली. येथे १८ वर्षीय कु. आयशा कलीम शेख हिने घरात कोणी नसताना गळफास घेऊन जीवन संपवले.
ही घटना उघडकीस येताच कुटुंबीय व स्थानिकांनी तातडीने तिला खाली उतरवून सिरोंचा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पुढील प्रक्रियेसाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
दुसरी घटना असरली परिसरात घडली. येथे २० वर्षीय राजू गंगाराम जेंगटे याने अज्ञात कारणांमुळे एकट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यालाही तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले; परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.
अवघ्या एका दिवसात दोन तरुणांनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून या घटनांमागील कारणांबाबत विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
दोन्ही प्रकरणांमध्ये असरली पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून आत्महत्येच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी नातेवाईक व स्थानिकांची चौकशी सुरू आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मानसिक ताणतणावाच्या काळात एकटे राहू नये. अडचणींच्या वेळी कुटुंबीय, मित्र किंवा तज्ञांची मदत घ्यावी, जेणेकरून अशा दुर्दैवी घटनांना आळा घालता येईल.