भामरागड | नगरपंचायत कारभारात हस्तक्षेपाचा आरोप; नगराध्यक्षांच्या पतीविरोधात सदस्यांचे निवेदन
गडचिरोली : भामरागड नगरपंचायतीच्या कामकाजात अनधिकृत हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप करत नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. नगराध्यक्षा श्रीमती रामबाई कोमटी महाका यांचे पती श्री. तपेश हलदार हे नियमितपणे नगरपंचायतीच्या सभांमध्ये हस्तक्षेप करत असून कार्यालयीन कामकाजातही ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, संबंधित व्यक्ती सभेदरम्यान निर्णय प्रक्रियेत हस्तक्षेप करत असल्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या अधिकारावर गदा येत आहे. तसेच, सदस्यांची संमती न घेता बांधकाम कामांचे लोकेशन परस्पर बदलून कंत्राटदारांवर दबाव टाकल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मुख्याधिकारी, नगरपंचायत भामरागड यांच्याकडे करण्यात आली आहे.
यावेळी नगरउपाध्यक्ष श्री. विष्णू मडावी, श्रीमती तेजस्विनी कोरके, बांधकाम सभापती श्रीमती कविता येतकमवर, स्वच्छता व आरोग्य सभापती श्रीमती सच्चीरेखा आत्राम, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती ललिता पुंगाटी तसेच अन्य नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या तक्रारीमुळे भामरागड नगरपंचायतीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन पुढील काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.