३३ टक्के कोट्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पीडब्ल्यूडीकडे निवेदन
📍गडचिरोली : अहेरी उपविभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांच्या हक्कांसाठी अहेरी उपविभागीय सुशिक्षित बेरोजगार अभियंता समन्वय संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. दिनांक ११ मार्च २०२६ रोजी आलापल्ली येथील PWD Rest House Alapalli येथे झालेल्या बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी एकमताने गठीत करण्यात आली.
बैठकीत अमित राजू येनप्रेड्डीवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच महेश लक्ष्मण येर्रावार व वैभव दिलीप देशमुख यांची उपाध्यक्ष, संदीप मलरेड्डी येमनुरवार यांची सचिव, शुभम प्रशांत कुत्तरमारे यांची सहसचिव, तर पुनेश राजेश्वर कंदीकुरवार यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय सागर घनश्याम डेकाटे, लक्ष्मण भाऊराव मेश्राम, अन्वेष लच्चया गद्देवार, दानिश अशफाक शेख, रितीक विवेक चेलियालवार व मुकेश रत्नावार यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
दरम्यान, १२ मार्च २०२६ रोजी संघटनेच्या वतीने Public Works Department Maharashtra च्या आलापल्ली येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शासन निर्णयानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदारांसाठी राखीव असलेल्या ३३ टक्के कामांच्या कोट्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता ठेवून स्थानिक सुशिक्षित अभियंत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनाने स्थानिक सुशिक्षित अभियंत्यांना कामाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ३३ टक्के कोट्याची तरतूद केली आहे. मात्र अनेक ठिकाणी या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करून स्थानिक अभियंत्यांना न्याय मिळावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.