जिल्हा प्रशासनाचे धाडसत्र; हॉटेल, कॅटरिंग व मंगल कार्यालयांवर छापे
📍 गोंदिया
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या संभाव्य तुटवड्याची शक्यता लक्षात घेऊन घरगुती गॅसचा व्यावसायिक कारणांसाठी अवैध वापर करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्हाधिकारी Prajit Nair यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विशेष दक्षता पथके स्थापन करण्यात आली असून हॉटेल, कॅटरिंग व मंगल कार्यालयांवर धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. या कारवाईत आतापर्यंत १५ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या फिरत्या पथकाने गोंदिया व तिरोडा तालुक्यातील सहा व्यावसायिक प्रतिष्ठानांवर अचानक छापे टाकले. त्यामध्ये गोंदिया तालुक्यातील एका ठिकाणाहून सात घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले, तर तिरोडा तालुक्यात पाच ठिकाणी छापे टाकून आठ सिलेंडर जप्त करण्यात आले.
घरगुती गॅसचा बेकायदेशीर साठा व व्यावसायिक वापर केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर Essential Commodities Act 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना आपल्या कार्यक्षेत्रात दक्षता पथके सक्रिय करण्याचे आदेश दिले आहेत. गॅस एजन्सींच्या नोंदी, विक्री रजिस्टर, स्टॉक तसेच व्यावसायिक गॅसच्या वितरणाची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः हॉस्पिटल, रेस्टॉरंट्स व बेकरीमध्ये घरगुती गॅसचा वापर होत नाही ना, याची खात्री करण्यास सांगितले आहे.
“इंधन दरवाढ किंवा तुटवड्याची शक्यता असताना घरगुती गॅसचा गैरवापर करून सर्वसामान्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध वापर आढळल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिला.
दरम्यान, प्रशासनाच्या या धाडसत्रामुळे अवैध गॅस रिफिलिंग व व्यावसायिक वापराचे रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून घरगुती गॅसचा पुरवठा सर्वसामान्यांसाठी सुरळीत राहावा, हा या मोहिमेमागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.