Home Breaking News अधिवेशनातून थेट रुग्णालय गाठले; अफवांना पूर्णविराम देत डॉक्टर आमदाराने तपासली रुग्णांची नाडी….

अधिवेशनातून थेट रुग्णालय गाठले; अफवांना पूर्णविराम देत डॉक्टर आमदाराने तपासली रुग्णांची नाडी….

0
25

 

अधिवेशनातून थेट रुग्णालय गाठले; अफवांना पूर्णविराम देत डॉक्टर आमदाराने तपासली रुग्णांची नाडी….

गडचिरोली: राजकारणात गेल्यानंतर अनेकजण आपली मूळ ओळख विसरतात, पण गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी मात्र आपल्यातील ‘डॉक्टर’ आजही जिवंत ठेवला आहे. चामोर्शी तालुक्यातील मुरखळा येथील २२ नागरिकांना अचानक ताप आल्याची बातमी समजताच, मुंबईतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज आटोपून परतलेल्या डॉ. नरोटे यांनी विश्रांती न घेता थेट जिल्हा रुग्णालय गाठले. रुग्णांची आस्थेने विचारपूस करत त्यांनी स्वतः वैद्यकीय भूमिकेतून परिस्थितीचा सखोल आढावा घेतला.

चामोर्शी तालुक्यातील मुरखळा येथील सुमारे २२ जणांना ताप आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. नरोटे यांना अधिवेशनात असताना मिळाली होती. दरम्यान, सोशल मीडियावर ‘हत्तीरोगाच्या गोळ्या घेतल्यामुळे हा ताप आला’ अशा चुकीच्या चर्चा आणि अफवा वेगाने पसरू लागल्या होत्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही बाब गांभीर्याने घेत डॉ. नरोटे यांनी गडचिरोलीत पोहोचताच सर्वप्रथम रुग्णालयाला भेट दिली.

“मी स्वतः जिल्हा शल्य चिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टरांशी या संदर्भात सविस्तर चर्चा केली आहे. हा ताप कोणत्याही औषधांच्या दुष्परिणामामुळे नसून केवळ ‘व्हायरल इन्फेक्शन’ (विषाणूजन्य संसर्ग) मुळे आल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अफवांना बळी पडू नये. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असून ती पूर्णपणे सामान्य आहे,” असे स्पष्टीकरण आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी दिले.
आमदार झाल्यानंतरही डॉ. मिलिंद नरोटे अनेकदा रुग्णांवर उपचार करताना किंवा त्यांच्या प्रकृतीची वैद्यकीयदृष्ट्या तपासणी करताना दिसून येतात. आजही त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून प्रत्येक रुग्णाच्या उपचारांची माहिती घेतली. प्रशासन आणि आरोग्य विभाग परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून असून सर्व रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील याची खात्री त्यांनी केली.

यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर, भाजपा चामोर्शी तालुका महामंत्री शेषराव कोहळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. राजकारणातील व्यस्ततेतही आपल्या मूळ पेशाला जागत रुग्णांच्या मदतीला धावून जाण्याच्या त्यांच्या या कृतीचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here