Home Breaking News लॉयड्स मेटल्सच्या क्रिकेट टिमचा दक्षिण भारतातही डंका बिग भारत लीगमध्ये ठरले...

लॉयड्स मेटल्सच्या क्रिकेट टिमचा दक्षिण भारतातही डंका बिग भारत लीगमध्ये ठरले विजेते

0
21

गडचिरोली : जिल्ह्यातील लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.च्या संघाने आंध्र प्रदेशातील प्रमुख कॉर्पोरेट क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या बिग भारत लीग (BBL) सिझन-2 मध्ये शानदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा 14 फेब्रुवारी ते 4 मार्चदरम्यान विशाखापटनम येथे आयोजित करण्यात आली होती. उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत लॉयड्सच्या क्रिकेट संघाने विजेतेपदाची ट्रॉफी आणि ₹2,00,000 चे रोख पारितोषिक पटकावले.

या स्पर्धेत शासन, कॉर्पोरेट, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. यात लॉयड्स मेटल्स व्यतिरिक्त केंद्र सरकारचा बाईकर्स स्टुडिओ यूनियन हिटर्स, रेल्वे विभागाचा इलाईट रेल स्ट्राईकर्स, विनस्मिथ स्टेट डायनामाईट्स, आयुषमान व्हाईट कोट वॉरियर्स, फॉर्च्यून कॉर्पोरेट किंग्स यांच्यासह इतर अनेक प्रमुख संघांचा समावेश होता.

कर्णधार विजय कोडापे यांच्या नेतृत्वाखाली लॉयड्स मेटल्सच्या संघाने उत्कृष्ट संघभावना आणि सर्वांगीण खेळाच्या जोरावर नॉकआउट फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत झालेल्या चुरशीच्या सामन्यात लॉयड्स संघाने फॉर्च्यून कॉर्पोरेट किंग्स संघावर तीन विकेट्सने रोमांचक विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

ग्रँड फायनलमध्ये इकेन्ट्रिक पॉवर टायकॉन्स संघासोबत झालेल्या लढतीत लॉयड्स संघाने प्रथम फलंदाजी करत 174 धावांचे लक्ष्य उभे केले. त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला 116 धावांवर रोखले आणि 58 धावांनी शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात नंदकुमार यांनी महत्त्वाची भूमिका बजावत 47 धावा केल्या आणि एक विकेट घेतली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना ‘मॅन ऑफ द फायनल’ पुरस्कार देण्यात आला. उपदेश राजपूत यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक म्हणून गौरविण्यात आले, तर कर्णधार विजय कोडापे यांना संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीबद्दल ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार मिळाला.

लॉयड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लि.चे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत कंपनीत कार्यरत इतर खेळाडूंनाही त्यांच्या आवडत्या खेळासाठी कंपनीकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. हा विजय लॉयड्स मेटल्ससाठी अभिमानाचा क्षण असून स्थानिक युवा प्रतिभांना खेळात सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याची भावना प्रभाकरन यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here